बारामती: अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे बारामतीत फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष करण्यात आला.
बारामती शहरात ठीक ठिकाणी भगवे ध्वज उभारून विविध इमारतींवर तसेच घरांवर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच घरांच्या अंगणात रांगोळी काढण्यात आली होती.
बारामतीतील ऐतिहासिक देवळ यांच्या श्रीराम मंदीरात बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आरती करण्यात आली. या प्रसंगी योजना देवळे, नेहा देवळे, पूजा देवळे, किशोर देवळे, मकरंद देवळे, ओंकार देवळे उपस्थित होते.
बारामती शहरातील भिगवण चौकात श्रीरामाची भव्य मूर्ती उभारण्यात आली होती. या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी राम भक्तांनी मोठी गर्दी केली.अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त श्रीराम मंदीरात महिलांनी सुंदरकांड वाचन केले. त्या नंतर श्रीरामाचा जयघोष करण्यात आला. हनुमा चालिसा पठण व श्रीरामांची आरती केली गेली. मंदीरामध्ये आकर्षक सजावट करण्यात आली होती, मंदीरावर रोषणाई केली गेली. रामनामाच्या जपाने मंदीराचा परिसर दुमदुमला होता. शहरात असंख्य ठिकाणी भगवे झेंडे डौलाने फडकत होते. शहरातील घरांसह, संस्था व जागोजागी भगवे झेंडे लावलेले होते. अनेक ठिकाणी भव्य फलक लावलेले होते. शहरातील महत्वाच्या चौकात कमानी उभारण्यात आल्या होत्या. अनेक मंडळे व कार्यकर्त्यांनी लाडू व पेढ्यांचेही वाटप केले. काही ठिकाणी दुकानदारांनी अयोध्येतील सोहळ्याचे प्रक्षेपण टीव्हीवर दाखविण्याची सोय केली होती.
दरम्यान, अयोध्येतील प्रभु श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या धर्तीवर अवघी बारामती नगरी प्रभू श्रीरामांच्या भक्तीमय रंगात रंगून गेल्याचे चित्र शहरांमध्ये पाहायला मिळत आहे. शहरांतील रस्त्यावर अनेक ठिकाणी प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाचे स्वागताचे बॅनर, कमानी भगवे ध्वज, पताका, आकाश कंदील लावल्याने शहरातील वातावरण भगवेमय झाले यावेळी महाप्रसादाचे आयोजन केले आहे.तसेच अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यानी शहरात घरोघरी जाऊन लाडूचा प्रसाद वाटला.