सौजन्य - सोशल मीडिया
सातारा : कास पठार परिसरात पावसाळी पर्यटन आता बहरू लागले असून कास तलाव परिसरात पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. शनिवार, रविवार व बकरी ईद अशा सलग सुट्ट्या जोडून आल्याने कासचे पर्यटन मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. उत्तेश्वर घाटापासून कास पठार, कास तलावापर्यंत पर्यटकांच्या वाहनांची गर्दी दिसून आली. कास, बामणोली परिसरात अधून मधून रिमझिम पडणारा पाऊस यामुळे संपूर्ण परिसर हिरवागार झाला असून काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात ओढे व झरे वाहू लागले आहेत. कास पुष्प पठार, कास तलाव या परिसरात देखील अधून मधून पडणारा पाऊस व दाट धुके यामुळे या परिसरातील वातावरण अल्हाददायक बनले आहे. सुट्टीचा आनंद निसर्ग अनुभवून पर्यटकांनी घेतला.
निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद
आता कुठे पावसाची चाहूल लागली असून, पर्यटकांची पावले आता कास, बामणोली परिसराकडे वळू लागली आहेत. कोयना धरण शिवसागर जलाशयाची पाणी पातळी खालावल्याने बोटिंग व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. मात्र, या परिसरामध्ये फिरायला जाणारे पर्यटक हे निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत. फोटोग्राफीही अनेकजण करत आहेत. अनेक पर्यटकांनी कास व परिसरातील निसर्गाची भ्रमंती केली. तेथील विविध प्रकारच्या झाडांचेही अवलोकन केले. कासपठार फुलल्यानंतर पर्यटकांची गर्दी आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.