कोल्हापूर : कोल्हापुरात केएमटी कर्मचाऱ्यांनी (KMT Employee) बेमुदत संप पुकारला आहे. सातव्या वेतन आयोगासह (7th Pay Commission) अन्य मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या संपामुळे सकाळपासून केएमटी सेवेवर परिणाम झाला आहे. सर्वच केएमटी बसेस वर्कशॉपमध्ये थांबून आहेत. त्यामुळे शहरातील सार्वजनिक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. संपकरी कर्मचारी वर्कशॉपमध्ये जमले आहेत. प्रशासनाच्या ठाम आश्वासनाशिवाय संप मागे घेणार नाही, अशी भूमिका मांडली आहे.
केएमटी कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोग, रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्यासह विविध मागण्यांसाठी केएमटी कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे. दुसरीकडे, कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून पोलिस बंदोबस्तात बस मार्गस्थ करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. मुक्कामाला असणाऱ्या २० बसेस परत बोलावण्यात आल्या आहेत. एकही बस बाहेर पडू दिली जाणार नाही, असा इशारा म्युनिसिपल ट्रान्स्पोर्ट वर्कर्स युनियनचे निशिकांत सरनाईक यांनी दिला आहे. त्यांना रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनने पाठिंबा दिला आहे. यापूर्वीच, विविध मागण्यांसाठी युनियनने संपाचा इशारा दिला होता. त्याबाबत आजपर्यंत मुदत देण्यात आली होती.
केएमटी प्रशासनाकडून अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक टीना गवळी यांनी वेतन आयोग व कर्मचाऱ्यांना कायम करण्याबाबत जूनमध्ये कार्यवाही करण्यात येईल. महागाई भत्त्याची २५ टक्के रक्कम जूनच्या पगारात जमा करण्यात येईल, अशी भूमिका मांडली होती. मात्र, सरनाईक यांनी तारखेची मागणी केली होती. त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने सरनाईक यांनी संपाची घोषणा केली.
२२ मार्गांवरील बससेवा बंद होणार
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या धोरणानुसार आयुर्मान संपलेल्या केएमटी बसेस एक एप्रिलपासून बंद होणार आहेत. त्यामुळे केवळ ५५ बस उपलब्ध होणार आहेत. प्रवाशांना बस चुकल्यास बराच वेळ ताटकळत उभे राहावं लागणार आहे. केएमटीकडून मार्गावरील बसचे नियोजन करण्यात आले आहे. त्यातून कमी उत्पन्न असलेल्या मार्गावरील बस बंद करण्यात येत आहे. त्या व्यतिरिक्त २२ मार्गांवर धावणाऱ्या बसेसपैकी प्रत्येकी एक बस कमी केली जाणार आहे.