सांगली : कोल्हापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस (सेमी बुलेट ट्रेन) अखेर सुरु होणार आहे. मात्र, सुरू होण्याआधीच मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सांगलीसारख्या महत्वाच्या शहरात थांबा न दिल्याने नागरिकांमधून प्रचंड नाराजी असून, सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने पहिल्याच दिवशी ‘वंदे भारत’चा (Vande Bharat) रेल रोको करण्याचा इशारा दिल्याने वंदे भारतला ब्रेक घ्यावा लागणार आहे.
या रेल्वे मार्गावर सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या सांगली रेल्वे स्थानकावरच वंदे भारत गाडीला थांबा दिला नाही, सांगलीत थांबा न दिल्याने गाडी 50 टक्के मोकळी धावेल व मोठा तोटा होईल. पुणे-सांगली-बेंगलोर रेल्वे दुपदरीकरण 5000 कोटींच्या प्रकल्पामुळे मुंबई, पुणे ते सांगली प्रवास जलद होईल हे स्वप्न अपूर्ण राहील.
महाराष्ट्राची पाचवी वंदे भारत एक्सप्रेस ही सेमी बुलेट ट्रेन मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कोल्हापुर दरम्यान सुरू होत आहे. वंदे भारत एक्सप्रेसला पुण्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचे दुसरे मोठे शहर सांगली रेल्वे स्टेशनवर थांबाच दिला नाही. सांगली ही जागतिक हळदी नगरी, देशातील प्रमुख साखर उत्पादन क्षेत्र, बेदाणा, गुळाची मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. मुंबई, पुणे नंतर सांगली शहरात मोठमोठे मल्टिस्पशालिटी हॉस्पिटल व उच्च तांत्रिक वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत.
मुंबई-कोल्हापूर मार्गावर धावणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेस गाडीत रोज चढणारे व उतरणारे मिळून एकूण 350 प्रवासी सांगली रेल्वे स्टेशनवरुन प्रवास करतात. या गाडीची सर्वाधिक 50 टक्के तिकिटे विक्री व उत्पन्न सांगली रेल्वे स्टेशनवरून बुक होतात. वंदे भारत एक्सप्रेसला सांगलीत थांबा न देणे हे आत्मघातकी ठरेल कारण ही गाडी अर्धी मोकळी धावेल व गाडी तोट्यात जाईल. मध्य रेल्वेच्या ज्या अधिकाऱ्यानी वंदे भारत एक्सप्रेसला सांगलीत थांबा दिला नाही त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.