देवेंद्र फडणवीस (Image- fadanvis You tube channel)
कोल्हापूर: राज्य सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांच्यात खात्यात दर महिन्याला १,५०० रुपये जमा केले जाणार आहेत. त्यानुसार आतापर्यंत जवळपास १ ते सव्वा कोटी महिलांच्या खात्यात आहेत. दरम्यान राज्यभर माझी लाडकी बहीण योजनेचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. आज कोल्हापूर येथे महायुतीचा एक मेळावा आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आज कोल्हापुरात पार पडला. यावेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपस्थितांना संबोधित केले. तसेच ही योजना बंद होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ”आपल्या सरकारने महिलांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. एसटी प्रवास अर्ध्या तिकिटात केला. त्यामुळे तोट्यात असलेली एसटी फायद्यात आली. महिलांना काही दिले तरी त्याचे सोने करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला १,५०० रुपये आपण महिलांना देतोय.”
शक्तीपीठात शक्तीस्वरूपा बहिणींना वंदन!#Kolhapur #MajhiLadkiBahin #Maharashtra pic.twitter.com/JXNEP1STNS
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 22, 2024
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, ” काही जण या योजनेवर देखील टीका करत आहेत. काही जण विचारतात तुम्ही महिलांना विकत घेत आहात का? बहिणींनो हे संवेदना हीन लोक आहेत. यांना बहिणीचे प्रेम समजूच शकत नाही. या ठिकाणी १५०० काय १५ कोटी दिले तरी आईच आणि बहिणीचं प्रेम कधी विकत घेता येत नाही. प्रेमाला कधी लाच देता येत नाही. मात्र ही योजना बंद पडली पाहिजे म्हणून सातत्याने प्रयत्न चालू आहेत. हे लोक कोर्टामध्ये देखील गेले. पण तिथेही हरले. ”
”काळजी करू नका. हे सावत्र भाऊ काहीही सांगत असेल तरीही, दर महिन्याला हा पैसे तुमच्या खात्यात येईल. याची तरतूद बजेटमध्ये केलेली आहे. दरवर्षी बजेटमध्ये याची तरतूद असणारच आहे. त्यामुळे ही योजना बंद होणार नाही. बदलापूरसारख्या घटना या मानवतेला काळिमा फासणाऱ्या आहेत. या विषयावर राजकारण करणे यासारखी मोठी संवेदनहीनता नाही. अशा घटनांमधील आरोपीना आम्ही सोडणार नाही. यांना कठोरात कठोर शिक्षा मिळेपर्यंत शांत बसणार नाही. काहीही झालं तरी अशा नराधमांना समाप्त केल्याशिवाय आम्ही बाजूला हटणार नाही,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.