कोयना धरण 100 टक्के भरले असून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे (फोटो - सोशल मीडिया)
Koyna Dam News : पाटण : राज्यामध्ये मागील आठवड्यापासून तुफान पाऊस बरसला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भामध्ये देखील तुफान पाऊस झाला आहे. यानंतर शनिवारी (दि.20) सकाळी अखेर कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. यानंतर धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी शनिवारी धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फूट उचलून ८ हजार ५०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. दरम्यान कोयना धरणात शनिवारी सायंकाळपर्यंत १०५.१४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण पूर्ण भरल्यामुळे यावर्षी राज्यातील सिंचन आणि वीज हे दोन्ही प्रश्न मिटले असल्याने ऐन नवरात्रोत्सव तोंडावरच कोयना धरण भरल्याने राज्यातील जनतेला मिळालेली ही भेट मानली जात आहे.
राज्याची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या आणि १०५.१४ टीएमसी पाणीसाठवन क्षमता असणाऱ्या कोयना धरणाच्या पाणीसाठ्याने मे महिन्यांपर्यत तळ गाठून धरणातील पाणीसाठा अवघा १० टीएमसी शिल्लक राहिला होता. जून महिनाअखेर पर्यंत पावसाचा मागमूस नसल्याने कोयना धरण यावर्षी पूर्ण क्षमतेने भरेल की नाही याबाबत चिंता लागून राहिली होती. मात्र राज्याच्या सर्वदूर विभागासह कोयना पाणलोट क्षेत्रात जुलै आणि ऑगष्ट महिन्यात दमदार आणि संततधार पाऊस कोसळला आणि या पावसामुळे राज्यात निर्माण झालेली दुष्काळजन्य परिस्थितीवर यशस्वीपणे मात झाली आणि कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात उच्चांकी गतीने वाढ झाली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील पहिल्याच आठवडयात कोसळलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात दररोज ४ते ५ टीएमसी या गतीने वाढ होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर धरणाच्या पाणीसाठ्यात कमालीची वाढ होण्यास सुरुवात झाली आणि ८० टीएमसीचा टप्पा ओलांडल्यानंतर धरणाचे सहा वक्र दरवाजे तीन फुटांनी उचलून कोयना नदीपात्रात सलग तीन दिवस प्रतिसेकंद १८हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. मात्र ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यानंतर पावसाचा जोर ओसरू लागला परिणामी धरणाच्या पाणीसाठ्यात धिम्या गतीने वाढ सुरु झाली आणि अखेर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेले कोयना धरणाच्या पाणीसाठ्याने शनिवारी सकाळी १०५.१४ टीएमसीचा टप्पा गाठून धरण पूर्ण क्षमतेने भरल्याचा संकेत मिळाला आणि ऐन नवरात्रोत्सव च्या तोंडावर राज्याला मोठी भेट मिळाली. दरम्यान २ हजार मेगावॅट वीजनिर्मिती करणारे कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे राज्यातील वीजनिर्मिती आणि सिंचन याची झळ यावर्षीही राज्यातील जनतेला बसणार नाही .
धरणाचे सहा वक्र दरवाजे १ फुटांनी उचलले..!
कोयना धरण परिसरात पावसाची रिपरिप सुरूच असून धरणात प्रतिसेकंद ८हजार ४९ क्युसेक पाण्याची आवक सुरु असलेने धरणातील पाणी नियंत्रित करण्यासाठी शनिवारी सकाळी साडे दहा धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फूट उचलून धरणातून प्रतिसेकंद ६हजार ४०० आणि धरणाच्या पायथा विजगृहातून २१०० क्युसेक असे मिळून एकूण ८ हजार ५०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.पावसाचे प्रमाण वाढल्यास विसर्ग आणखी वाढवण्याची शक्यता आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
धरणात १६४.३३ टीएमसी पाण्याची आवक
१०५.२५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असणाऱ्या कोयना धरणात या वर्षी एकूण १६४.३३ टीएमसी पाण्याची आवक झाली असून पूर नियंत्रण व पूर्वेकडील वीजनिर्मितीसाठी एकूण ६६.४३ टीएमसी पाण्याचा वापर करण्यात आला आहे तर पश्चिमेकडील विजनिर्मिसाठी एकूण १३.०५ टीएमसी पाण्याचा वापर करण्यात आला आहे दरम्यान धरणातील एकूण २.४० टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे.