सौजन्य - नवराष्ट्र टीम
पाटस : दौंड तालुक्यातुन गेलेल्या भीमा नदीच्या पाण्यामध्ये दौंडच्या पूर्व भागातील आलेगाव ते देऊळगावराजे या दोन्ही गावाच्या मध्यभागी काही शेतकऱ्यांना भली मोठी मगर पाण्यात दिसून आली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पुणे जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात मागील दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर असल्याने खडकवासला धरण व इतर धरणाचे पाणी मुळा मुठा नदीला सोडण्यात आले होते. हेच पाणी पुढे भीमा नदीच्या पात्राला जाऊन मिळाल्याने भीमा नदीचे पात्र पाण्याने दुधाडी भरून वाहत होती. भीमा नदीला व त्या लगेचच्या गावांमध्ये पुरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र होते .या वाहत्या पाण्याच्या प्रवाहात अनेक जलचर प्राणी वाहून येत असतात. घोणस, मण्यार असे अनेक विषारी जातीचे सर्प नदी नदीच्या पाण्यात वाहून आल्याने ते नदी लगतच्या गावांमध्ये पाहायला मिळतात.
सध्या धरण क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतल्याने भीमा नदीचे पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे या नदीच्या पाण्यात एक भली मोठी मगर आलेगाव परिसरातील काही शेतकऱ्यांना दिसून आली. सुरुवातीला त्यांना मगर असल्याचा विश्वास बसला नाही, मात्र त्यांनी पाण्यात दगड मारला आणि मगरीने हालचाल केली, त्यामुळे ती मगरच असल्याचे दिसून आले. या भीमा नदीच्या पाण्याच्या प्रवाहात ती वाहून आली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र , या प्रकारामुळे आलेगाव, देऊळगावराजे या परिसरात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या संदर्भात जलसंपदा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.