कुरवंडे गावात प्रस्तावित टायगर पॉईंट प्रकल्प होणार असून यामुळे लोणावळा पर्यटनामध्ये वाढ होणार आहे (फोटो - सोशल मीडिया)
Lonavala Tiger Point : वडगाव मावळ : प्रतिनिधी : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. मंत्रालयात लोणावळा येथील कुरवंडे गावात प्रस्तावित टायगर पॉईंट प्रकल्पाबाबत ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या प्रकल्पासाठी ५ फेब्रुवारी २०२४ रोजीच ३३३ कोटी रुपयांची मान्यता मिळाली असून, पर्यटन विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प मावळ तालुक्याचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. यामुळे लोणावळ्याकडे पर्यटकांचा कल अधिक वाढणार आहे.
बैठकीत या प्रकल्पात प्रवेशद्वार, टिकीट घर, फूड कोर्ट, स्नॅक बार, वाहनतळ, कनिष्ठ समारंभ हॉल अशा सुविधा उभारल्या जाणार आहेत. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सायटसीईंग, झिप लाईन, बंजी जंपिंग, वॉल क्लायम्बिंग, फेरीस व्हील अशा साहसी खेळांचा समावेश करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मनोरंजन व सुरक्षतेच्या दृष्टीने झुला, रेन डान्स, स्केटिंग रिंक, पाण्याची टाकी, सीसीटीव्ही कॅमेरे, ध्वनीप्रणाली, प्रकाशयोजना यांचा प्रकल्पात समावेश असून, उन्हाळ्यातील वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षेवर विशेष भर दिला जाणार आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
स्थानिकांना स्कायवॉकचा अनुभव मिळावा यासाठी दरमहा ध्वजवंदन सोहळा आयोजित करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. अॅडव्हेंचर व अम्युझमेंट पार्क उभारून मावळ तालुक्यातील पर्यटन सुविधा अधिक बळकट करण्याचा प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आला. त्याचप्रमाणे प्रकल्प परिसरात टेंटिंग व इतर निवास व्यवस्था उभारून पर्यटकांच्या मुक्कामासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
या प्रकल्पाच्या माध्यमातून मावळ तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे रोजगारनिर्मिती वाढून ग्रामीण भाग समृद्ध होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. यावेळी या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार सुनील शेळके सुभाष शिरोळे, नियोजन विभागाचे राजेश रासमुथ, रामोजी फिल्म सिटी अध्यक्ष रमेश जाणपुथकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर लोणावळा पर्यटनाला नवे रूप मिळेल आणि मावळ तालुका राज्यातील प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून उदयास येईल, अशी अपेक्षा मावळचे आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मावळमध्ये नवीन न्यायालय इमारतीची होणार उभारणी
मावळमध्ये नागरिकांच्या न्यायप्रवेशासाठी दीर्घकाळापासूनची उणीव भासत असलेल्या भव्य न्यायालयीन वास्तू उभारणीचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. कृषी विभागाच्या जागेवर उभारण्यात येणारी ही इमारत पुढील ५० वर्षांचा विचार करून आधुनिक व अत्याधुनिक सुविधांसह बांधली जाणार आहे. या भव्य इमारतीमुळे वडगाव मावळ व परिसरातील नागरिकांना त्वरित, सुलभ व पारदर्शक न्याय मिळविण्याचा मार्ग सुकर होणार आहे. विशेषत: ग्रामीण व दुर्बल घटकांनाही न्याय मिळविण्यात आत्मविश्वास निर्माण होईल, न्यायालयीन कामकाजात कार्यक्षमता वाढविणे, वकिलांना योग्य सुविधा उपलब्ध करणे आणि सर्वसामान्यांना न्यायालयीन वातावरणात सहज प्रवेश मिळावा हा या प्रकल्पामागील मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले.