फोटो सौजन्य- iStock
ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्यावतीने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राबविण्यात येते. याअंतर्गत महिलांना कौशल्य व उद्योगाभिमुख प्रशिक्षणे देण्यात येतात. या महिलांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ प्राप्त करून देण्यासाठी ‘महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन – २०२४’ चे आयोजन सिडको एक्झीबिशन सेंटर, वाशी, नवी मुंबई येथे १४ ते २५ डिसेंबरपर्यंत करण्यात आले आहे. या प्रदर्शनाद्वारे महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील महिलांना स्वयंसहाय्यता समूहाच्या माध्यमातून संघटित करून त्यांना वैयक्तिक, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या विकसित करण्याचे उद्दिष्ट असते.
उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमाद्वारे लाखो महिला सक्षम उद्योजिका अनेक उत्पादनांची निर्मिती करत आहेत. त्यांनी तयार केलेली विविध उत्पादने देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवून या महिला उद्योजिकांना अधिकाधिक प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून दरवषी ‘महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन’ आयोजित केले जात आहे. महालक्ष्मी सरसचे आयोजन आतापर्यंत मुंबई, नवी मुंबई, नागपूर या ठिकाणी करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला नागरिकांकडून दरवर्षी उत्तम प्रतिसाद मिळतो.
महालक्ष्मी सरसमधील स्टॉल
नवी मुंबईतील ‘महालक्ष्मी सरस’ चे हे दुसरे वर्ष आहे. या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्रातील तब्बल ३७५, इतर राज्यातील सुमारे १०० स्टॉल असणार आहेत. या प्रदर्शामध्ये खमंग आणि रुचकर शाकाहारी व मांसाहारी खाद्यपदार्थांचे सुमारे ७५ स्टॉल असणार आहेत. या स्टॉलसचे एक स्वतंत्र भव्य असे ‘फूड कोर्ट’ असणार आहे.
विक्री प्रदर्शनातील वस्तू
या विक्री प्रदर्शनात अनेक प्रकारच्या कलाकुसरीच्या वस्तू, हातमागावर तयार केलेले कपडे, बंजारा आर्ट, वुडन क्राफ्ट, वारली आर्टच्या वस्तू उपलब्ध होणार आहेत. तसेच महिलांच्या आकर्षणाच्या अनेक प्रकारच्या ज्वेलरी, लहान मुलांसाठी लाकडी खेळणी व इतर राज्यातील दुर्मिळ वस्तूंची रेलचेले येथे असणार आहे. या प्रदर्शनातून ग्रामीण संस्कृतीचे दर्शन शहरी भागातील नागरिकांना होणार आहे. राज्याच्या सर्व भागाची चव या ठिकाणी भेट देणाऱ्यांना अनुभवता येणार आहे. सहकुटुंब भेट देणाऱ्या कुटुंबांचा विचार करून लहान मुलांना खेळवाडी (प्ले एरिया) उभारण्यात आला आहे. यावेळी या प्रदर्शनात अनुभव केंद्र असणार आहे.
नवी मुंबई परिसरात सुद्धा महालक्ष्मी सरस प्रदर्शनाची परंपरा निर्माण व्हावी या हेतूने सलग दुसऱ्या वर्षी वाशी येथे हे भव्य प्रदर्शन आयोजीत करण्यात आले आहे. या प्रदर्शनातून मोठ्या प्रमाणात विक्री होऊन ग्रामीण महिलांच्या कर्तृत्वाला व उद्योग व्यवसायाला हातभार लावण्यास मदत होईल त्यामुळे या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी असे आवाहन उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.