Photo Credit- Social media
नाशिक: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. अशातच राज्यातील एका विधानसभा मतदारसंघाकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे. तो म्हणजे येवला विधानसभा मतदारसंघ. नाशिक जिल्ह्यात येणारा येवला विघानसभा मतदारसंघ दिंडोरी लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येतो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांचे गेल्या काही वर्षांपासून या मतदारसंघात वर्चस्व आहे. पण यावेळची विधानसभा निवडणूक छगन भुजबळ यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरणार असल्याचे दिसत आहे.
छगन भुजबळ हे महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचे नेतृत्व करणारे मोठे नेते मानले जातात.पण राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडींमुळे एक अनिश्चितता निर्माण झाली आहे. याचे कारण म्हणजे, गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे सातत्याने भुजबळांवर हल्ला करताना दिसत आहेत. मनोज जरांगे यांनीदेखील छगन भुजबळांना पराभूत करण्याचा इशारा दिला आहे. छगन भुजबळांना आव्हान देत जरांगेनी येवला मतदारसंघात उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यामुळए आगामी विधानसभा निवडणुकीसाठी येवला मतदारसंघ हादेखील महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे.
हेदेखील वाचा: या सुपर गर्लची फाईट पाहून हॉलिवूड चित्रपटातील ॲक्शन सीनही पडतील फिके
2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या आकडेवारीनुसार येवला मतदारसंघात एकूण 297599 मतदार आहेत. येवला विधानसभेत अनुसूचित जातीच्या मतदारांची संख्या अंदाजे 28,400 आहे जी 2011 च्या जनगणनेनुसार अंदाजे 9.63% आहे. तर अनुसूचित जमातीच्या मतदारांची संख्या अंदाजे 35,566 आहे जी 2011 च्या जनगणनेनुसार अंदाजे 12.06% आहे. या ठिकाणी मुस्लिम मतदारांची संख्याही चांगली आहे. येथे अंदाजे 21,233 मुस्लिम मतदार आहेत जे सुमारे 7.2% आहे.
छगन भुजबळ यांनी काँग्रेसमधून राजकीय प्रवासाला सुरूवात केली होती. पण त्यानंतर त्यांनी 25 वर्षे शिवसेनेत काम केले. 1985 आणि 1990 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर माझगाव विधानसभा मतदारसंघातून ते आमदार झाले. पण 1999 मध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाल्यानंतर त्यांचा राजकीय उदय झाला. काही कालावधीतच ते महाराष्ट्राच्या राजकारणात ओबीसी चेहरा म्हणून उदयास आले. 2004 मध्ये भुजबळ राष्ट्रवादीच्या तिकिटावर नाशिकच्या येवला मतदारसंघातून आमदार झाले. 2004 पासून आतापर्यंत छगन भुजबळ यांचे येवल्याच्या जागेवर वर्चस्व आहे.
हेदेखील वाचा: हॅपी बर्थडे विनेश फोगाट! नजर टाका चॅम्पियन कुस्तीपटूंच्या विक्रमांवर