ऑक्टोबरमध्ये उडणार महापालिका निवडणुकांचा बार? किती टप्प्यात होणार निवडणुका?
गेल्या ३-४ वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. कधी आरक्षण तर कधी वॉर्डरचनेवरून निवडणुका रद्द करण्यात आल्या. सध्या नगरपालिका, महानगरपालिकांचा कारभार प्रशासकांच्या हाती आहे. दरम्यान अलिकडेच न्यायालयाने आदेश दिल्यानंतर निवडणुकांच्या हलचाली सुरू झाल्या असून दिवाळीत निवडणुकींचा बार उडण्याची शक्यता आहे. राज्यात ऑक्टोंबर महिन्यापासून निवडणुकीला सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका वेगवेगळ्या होणार आहेत. याबाबत निवडणूक आयोगाकडून लवकरच वेळापत्रक जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार टप्प्यांमध्ये होणार असल्याची माहिती समोर आली असून त्यापार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून तायरीही सुरू करण्यात आली आहे.
राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद अशा प्रमुख शहरांसह अनेक महापालिकांच्या आणि नगरपरिषदांच्या निवडणुका तब्बल ३-४ वर्षांपासून रखडल्या आहेत. यामागचं मुख्य कारण ठरलं ते ओबीसी आरक्षणाचा वाद. 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्रिस्तरीय चाचणी पूर्ण न झाल्यामुळे ओबीसी आरक्षण रद्द केलं होतं. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने बनठिया आयोगाची नियुक्ती करून अहवाल सादर केला. मात्र न्यायालयीन प्रक्रिया, सुनावण्या आणि राजकीय निर्णयांच्या विलंबामुळे निवडणुका पुढे ढकलल्या जात होत्या.
या काळात प्रशासकांकडे महापालिका आणि इतर स्थानिक संस्थांचा कारभार सोपवण्यात आला. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीत अनेक महत्त्वाचे निर्णय प्रशासनाच्या अधीन राहिले. त्यामुळे लोकशाहीचा गाभा असलेल्या या निवडणुका वेळेवर न होणं ही राज्यासाठी चिंतेची बाब बनली होती.
या संदर्भात अखेर 6 मे 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला ठोस निर्देश दिले. चार आठवड्यांच्या आत निवडणुकीची अधिसूचना जाहीर करावी आणि पुढील चार महिन्यांत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी, असा आदेश देण्यात आला. तसेच, आता त्रिस्तरीय चाचणी पूर्ण झालेली असल्याने ओबीसी आरक्षण जाही करण्यासही परवानगी दिली आहे. त्यामुळे येत्या ३-४ महिन्यात निवडणुका होणार आहेत.
दरम्यान, राज्य सरकारने सर्व 29 महापालिकांना वॉर्ड रचना आणि आरक्षण आराखडा पूर्ण करण्यासाठी 4 सप्टेंबर 2025 ही अंतिम मुदत दिली आहे. त्यामुळे येत्या सप्टेंबर अखेरपर्यंत निवडणुकांची पूर्वतयारी पूर्ण होईल आणि ऑक्टोबर–नोव्हेंबरमध्ये प्रत्यक्ष मतदान होण्याची शक्यता आहे. दिवाळीत निवडणुका घेण्यात येतील, असं राज्य निवडणूक आयोगाकडूनही सूचित करण्यात आलं आहे.
Abu Azami : मनसे-शिवसेना युतीवर अबू आझमींचे मोठे विधान; म्हणाले, ‘ राज अन् उद्धव एकत्र आले तर मला…’
या प्रक्रियेमुळे स्थानिक पातळीवरील लोकशाही व्यवस्थेला पुन्हा चालना मिळणार आहे. नगरसेवक, महापौर, अध्यक्ष आणि सदस्यांची निवड होऊन स्थानिक प्रश्नांवर राजकीय इच्छाशक्तीने निर्णय घेण्याची संधी नागरिकांना पुन्हा मिळणार आहे. दोन वर्षांपासून रखडलेल्या या निवडणुका आता प्रत्यक्षात येणार असल्याने राज्यातील राजकीय वातावरणही पुन्हा तापू लागलं आहे. विविध पक्षांनी निवडणुकांच्या तयारीला सुरुवात केली असून, काही ठिकाणी युतीच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत.