Today's Maharashtra Breaking News Updates in marathi 12.09.2026
नेपाळमधील भीषण महापुरातील मृतांचा आकडा १,००० च्या पार गेला असून, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने जागतिक आणि भारतीय शेअर बाजारात निर्माण झालेला दबाव या आजच्या प्रमुख घडामोडी आहेत.
नेपाळ आणि तिबेट सीमेवरील हिमकडा कोसळल्याने आलेल्या महापुरातील मृतांचा आकडा १,००० पार गेला असून ४,००० पेक्षा जास्त लोक अजूनही बेपत्ता आहेत.महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाने विश्रांती घेतली असली तरी हवामान विभागाने उत्तर भारत आणि कोकण किनारपट्टीच्या भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने भारतीय शेअर बाजारात (सेन्सेक्स आणि निफ्टी) आज घसरणीसह नकारात्मक सुरुवात झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या (Brent Crude) किमती प्रति बॅरल ९७ डॉलरच्या जवळ पोहोचल्यामुळे महागाई आणि इंधन दरांवर दबाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
02 Sep 2026 05:59 PM (IST)
भारताच्या रशियन कच्च्या तेलाच्या आयातीत ऑगस्टमध्ये मोठी घट नोंदवण्यात आली आहे . जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये रशियाकडून होणारी तेल आयात सुमारे २६.३ % कमी झाली . kpler च्या प्राथमिक आकडेवारी नुसार , भारताने ऑगस्टमध्ये दररोज सुमारे २.०८ दशलक्ष बॅरल रशियन कच्चे तेल आयात केले , तर जुलैमध्ये हा आकडा सुमारे २.८२ दशलक्ष बॅरल होता .
02 Sep 2026 05:50 PM (IST)
महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एसटी) आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी केवळ उत्पन्नवाढीवर भर न देता खर्चातही काटकसर करणे आवश्यक आहे. त्यासाठी पारंपरिक कार्यपद्धतीच्या चौकटीबाहेर जाऊन नाविन्यपूर्ण प्रयोग राबवावेत. विशेषतः ‘विना वाहक’ बससेवेला प्राधान्य देऊन मनुष्यबळावरील खर्चात बचत करण्याबरोबरच प्रवाशांना अधिक सुलभ आणि गतिमान सेवा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिले.
02 Sep 2026 05:40 PM (IST)
भारतीय क्रिकेट संघ ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंडचा दौरा करणार आहे. यावेळी दोन्ही संघ प्रत्येकी ५ एकदिवसीय आणि ५ टी-२० सामन्यांच्या मालिका तसेच, दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळतील. जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम सामन्याच्या दृष्टीने ही कसोटी मालिका भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे, न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाला तेथील वातावरणाशी जुळवून घेण्याची आणि परिस्थिती समजून घेण्याची संधी मिळेल. वरिष्ठ भारतीय संघापूर्वी, भारत ‘अ’ संघ न्यूझीलंड ‘अ’ संघाविरुद्ध तीन चार-दिवसीय सामने खेळण्यासाठी मैदानात उतरेल. हे सामने भारतासाठी कसोटी मालिकेची तयारी करण्याची एक महत्त्वाची संधी असेल.
02 Sep 2026 05:25 PM (IST)
शिवसेना कुणाची? आज सुप्रीम शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावरील सुनावणीत एकनाथ शिंदे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल यांनी बाजू मांडली. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील पक्षघटना आणि निवडणूक आयोगाशी झालेल्या पत्रव्यवहाराचा आधार घेत त्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकारक्षेत्राचा मुद्दा उपस्थित केला.
कौल यांच्या युक्तिवादानुसार, 1999 मध्ये निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांच्या अंतर्गत रचनेत लोकशाही प्रक्रिया असणे आवश्यक असल्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर शिवसेनेच्या पक्षघटनेत आवश्यक बदल करण्यात आले होते. यावरून बाळासाहेब ठाकरे यांनीही निवडणूक आयोगाचे अधिकार मान्य केले होते, असा दावा शिंदे गटाच्या वतीने करण्यात आला.
02 Sep 2026 05:12 PM (IST)
दिल्लीतील एका स्लीपर बसमध्ये १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेवरून राहुल गांधी यांनी केंद्र सरकार तसेच दिल्ली आणि उत्तर प्रदेश सरकारला जाब विचारला. ते म्हणाले, धावत्या बसमध्ये ४७ किलोमीटरच्या प्रवासादरम्यान त्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला, तरीही पोलिसांना या घटनेची अजिबातच खबर लागली नाही.
02 Sep 2026 04:57 PM (IST)
नालासोपारा पूर्व येथून सुरू झालेल्या एमडी ड्रग्ज तस्करीच्या तपासाचा धागा थेट उत्तर प्रदेशातील प्रयागराजपर्यंत पोहोचला असून, गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-४च्या पथकाने तेथील एमडी ड्रग्ज तयार करणारा बेकायदा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईत आतापर्यंत २१ आरोपींना अटक करण्यात आली असून, तब्बल ६९ किलो ७५९ ग्रॅम एमडी ड्रग्ज, २६० लिटर रसायने, प्रयोगशाळेतील साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण सुमारे १३९ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
२४ जून २०२६ रोजी रात्री नालासोपारा पूर्व, प्रगतीनगर ते मनवेलपाडा रोडलगत प्रिया वॉशिंग सेंटरजवळील बाबा पार्किंग परिसरात अविनाश ऊर्फ सोनू लोकनाथ अय्यर (२२) आणि रविकांत ओमप्रकाश राम (२३) हे ११२ ग्रॅम एमडी ड्रग्जसह आढळून आले होते. याप्रकरणी तुळिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
02 Sep 2026 04:45 PM (IST)
राज्य शासनाच्या मूलभूत विकास निधी योजनेतून मागील तीन वर्षांत शहरात सुमारे 100 ते 150 कोटी रुपयांची विकासकामे करण्यात आली आहेत. मात्र, या कामांचा मोबदला शासनाकडून अद्याप मिळालेला नसल्याने ठेकेदारांची कोट्यवधी रुपयांची बिले रखडली आहेत. गेल्या तीन वर्षांपासून कामांचा मोबदला मिळावा यासाठी ठेकेदारांकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मात्र, प्रत्येक वेळी केवळ आश्वासनांवर बोळवण होत असल्याचा आरोप ठेकेदारांनी केला आहे. अखेर बुधवारी ठेकेदार संघटनेच्या वतीने कल्याण-डोंबिवली महापालिका प्रवेशद्वारावर आंदोलन करत शासन आणि प्रशासनाचा निषेध करण्यात आला.
02 Sep 2026 04:35 PM (IST)
वसई-विरार शहर महानगरपालिकेपासून अवघ्या २०० मीटर अंतरावर नैसर्गिक नाला बुजवल्याच्या आरोपावरून स्थानिक नागरिकांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. सुमारे ३० फूट रुंदीचा नाला मातीचा भराव आणि अनधिकृत बांधकामामुळे केवळ ५ ते ७ फुटांवर आल्याचा नागरिकांचा आरोप आहे. त्यामुळे परिसरातील पाण्याचा निचरा बाधित होऊन संपूर्ण पाणी माझ्या घरात शिरत आहे असे त्यांचे म्हणणे आहे.
२०२५ मध्ये तक्रार करूनही कारवाई झाली नाही. उलट काही महिन्यांनंतर संबंधित बांधकामाला पालिकेने परवानगी दिल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. विरोधानंतर ही परवानगी रद्द करून तोडकामाचे आदेश देण्यात आले, मात्र अद्याप प्रत्यक्ष कारवाई झालेली नसल्याने नागरिक संतप्त आहेत. वारंवार पत्रव्यवहार आणि आश्वासनांनंतरही प्रश्न सुटला नसल्याने अखेर नागरिकांनी उपोषण आणि धरणे आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.
02 Sep 2026 04:23 PM (IST)
महाराष्ट्रात वेगाने पसरत असलेल्या ड्रग्ज नेटवर्कविरोधात मीरा-भाईंदर वसई-विरार पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका कुख्यात गँगचे नाव समोर आले आहे. कल्याणच्या ‘जालिम गँग’मधील काही गुर्ग्यांचा ड्रग्ज तयार करणे आणि त्याची तस्करी करणाऱ्या नेटवर्कमध्ये कथित सहभाग असल्याचे समोर आले आहे.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, जालिम गँगशी संबंधित कुख्यात आरोपींविरोधात मुंबई पोलिसांनी यापूर्वी मकोका म्हणजेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. आता याच गँगशी संबंधित काही व्यक्तींचे धागेदोरे ड्रग्जच्या अवैध व्यापार आणि ड्रग्ज निर्मितीशी जोडले जात असल्याचे तपासात समोर येत आहे.
02 Sep 2026 04:00 PM (IST)
ब्रिटनच्या राजकारणातून एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. ब्रिटनचे माजी पंतप्रधान आणि लेबर पार्टीचे ज्येष्ठ नेते कीर स्टारमर (Keir Starmer) यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन सक्रिय संसदीय राजकारणातून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधानपदावरून हटल्यानंतर अवघ्या ७१ दिवसांनी त्यांनी लंडनमधील ‘हॉलबॉर्न आणि सेंट पॅनक्रस’ (Holborn and St Pancras) या आपल्या पारंपरिक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सोडण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे २०१५ पासून सुरू झालेल्या त्यांच्या ११ वर्षांच्या प्रदीर्घ संसदीय कारकिर्दीचा प्रवास अधिकृतपणे थांबला आहे.
02 Sep 2026 03:55 PM (IST)
धुळे शहरालगत असलेल्या मोहाडी रानमळा रोडवरील सुरत-नागपूर महामार्गावर गोरक्षकांनी गोमांस घेऊन जाणारे वाहन पकडल्याचा दावा केला आहे. श्रावण महिन्यातही धुळे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात गोमांस आणि गाईंची वाहतूक होत असल्याचा आरोप गोरक्षकांकडून करण्यात आला आहे. या कथित तस्करीला धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील काही घटक जबाबदार असल्याचा गंभीर आरोपही गोरक्षकांनी केला आहे. बाजार समितीच्या मागील गटातून गाई पुरवल्या जात असल्याचा दावा त्यांनी केला असून, या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
02 Sep 2026 03:45 PM (IST)
Nagpur news : एसआयआरला शहरापेक्षा ग्रामीणमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघांत सर्वच विद्यमान आमदारांना आगामी काळात याचा फटका बसेल, असे एकूण एसआयआरवरून दिसते आहे. एसआयारनंतर सोमवारी प्रारूप मतदार यादीत जाहीर झाली. यात जिल्ह्यातील ४६,३८,५८९ मतदारांपैकी १४,४३,५११ मतदार गाळले गेले आहेत.
खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघात गेल्यावेळी मिळालेले मताधिक्यापेक्षा गळालेल्या मतदारांची संख्या चौपट आहे. २०२४ मध्ये फडणवीस यांनी प्रतिस्पधीं काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे यांचा ३९,७१० मतांनी पराभव केला. एसआयआरमध्ये त्यांच्या मतदारसंघात १,५४,००५ मतदार यादीतूनच बाहेर पडले आहे.
02 Sep 2026 03:40 PM (IST)
या कारमध्ये ११८.५ kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून twin permanent magnet इलेक्ट्रिक मोटर्सद्वारे ५४३ hp ची कमाल पावर आणि ८५० Nm चा पिक टॉर्क जनरेट होतो. ही SUV एका पूर्ण चार्जमध्ये WLTP सायकलनुसार ६०० किमीपर्यंतची रेंज देते, तर रोडवर ५३५ किमीची रेंज सहज मिळते. यात ३५० kW DC फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे, ज्यामुळे अवघ्या २२ मिनिटांत बॅटरी १० वरून ८० टक्क्यांपर्यंत चार्ज होते. तसेच अवघ्या १० मिनिटांच्या चार्जिंगवर गाडी २२० किमीची रेंज देऊ शकते.
02 Sep 2026 03:30 PM (IST)
या प्रशिक्षणात AI, क्लाउड कॉम्प्युटिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन या क्षेत्रांशी निगडीत प्रशिक्षण दिले जाईल. यामुळे त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळेल. तसेच उद्योगांच्या गरजेनुसार आवश्यक व्यावसायिक कौशल्ये विकसित करता येतील. प्रशिक्षणाच्या आयोजनातून तरुणांना या क्षेत्रातील कंपन्यांनी जुळवून देणे, हा यामागील मुख्य उद्देश आहे. तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील. त्यांना शिकाऊ उमेदवारी आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे मार्ग उपलब्ध होतील.
02 Sep 2026 03:25 PM (IST)
Psycho Ranga Movie: मराठी मनोरंजनविश्वात सध्या नव्या चित्रपटांची रेलचेल पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर ‘सायको रंगा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. दमदार कलाकारांची फळी आणि वेगळ्या विषयामुळे या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘सायको रंगा’ या आगामी चित्रपटाचा नवीन टीझर प्रदर्शित झाला असून पहिल्या टीझरनंतर आता चित्रपटाच्या कथानकातील महत्त्वाच्या व्यक्तिरेखांची ओळख प्रेक्षकांना होत आहे. या टीझरमध्ये रंगाच्या आयुष्यातील संघर्ष व त्याच्यासोबत असलेल्या आणि त्याच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या व्यक्तिरेखांमुळे कथेला नेमकं कोणतं वळण मिळणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
02 Sep 2026 03:20 PM (IST)
Cambridge survey 2025 India students : सध्याच्या काळात अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याला प्राधान्य देत असल्याचे मानले जाते, मात्र नुकत्याच समोर आलेल्या एका अहवालाने हा समज काहीसा बदलला आहे. परदेशात जाऊन पदवी घेण्याऐवजी भारतातच अंडरग्रॅजुएट (UG) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. ‘कॅब्रिज डेस्टिनेशन सर्व्हे २०२५-२६’ नुसार, २०२५ मध्ये भारतातील जितके विद्यार्थी युनिव्हर्सिटीत जाण्याची तयारी करत होते, त्यापैकी तब्बल अर्ध्या विद्यार्थ्यांनी देशातच राहून अंडरग्रॅजुएट शिक्षण घेण्याचा पर्याय निवडला आहे. २०२४ मध्ये हे प्रमाण ४७ टक्के होते, तर परदेशात UG करण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ४२ टक्क्यांवरून घसरून ४० टक्क्यांवर आले आहे.
02 Sep 2026 03:15 PM (IST)
Modi Cabinet Reshuffle: भाजपच्या संघटनात्मक पातळीवरील बदलांनंतर आता मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातील (Modi Cabinet Reshuffle) संभाव्य फेरबदलाची चर्चा सुरू झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुका आणि 2029 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाची नवी रचना केली जाऊ शकते, अशी राजकीय वर्तुळात अटकळ आहे. मंत्र्यांची कामगिरी, सामाजिक आणि प्रादेशिक समीकरणे तसेच निवडणूक होणाऱ्या राज्यांचे प्रतिनिधित्व या बाबींचा विचार केला जाऊ शकतो.
02 Sep 2026 03:10 PM (IST)
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) चे संस्थापक इम्रान खान (Imran khan) तसेच त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वाचा दिलासा दिला आहे. रावळपिंडी येथील अडियाला तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या या दोन्ही नेत्यांना दीर्घकाळापासून एकांतवासात (Solitary Confinement) ठेवण्यात आले होते. या एकांतवासाच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयाने हा प्रकार तात्काळ थांबवण्याचे आदेश तुरुंग प्रशासनाला दिले आहेत. न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, कैद्यांना कायद्यानुसार मिळणारे मूलभूत अधिकार आणि मानवी सुविधा मिळायलाच हव्यात, मग ती व्यक्ती कोणतीही असो.
02 Sep 2026 02:59 PM (IST)
पुण्यातील स्वारगेट चौकात दिवगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्मारक उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी राष्ट्रवादी युवकच्या कार्यकर्त्यांनी केलीय. या मागणीसंदर्भात पुणे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले असून, या विषयावर चर्चा करण्यासाठी आयुक्तांनी ८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता भेटीची वेळ दिल्याची माहिती देण्यात आलीय.
02 Sep 2026 02:50 PM (IST)
रोह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष संतोषजी पोटफोडे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहा शहराध्यक्ष अमित उकडे, माजी नगरसेवक मयूर पायगुडे, युवक शहराध्यक्ष सागर भोबड, तसेच पृथ्वीराज संतोष पोटफोडे आणि यशराज संतोष पोटफोडे या सर्व प्रमुख शिलेदारांनी अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला. या सर्व सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत करून, शुभेच्छा दिल्या.
02 Sep 2026 02:50 PM (IST)
डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करुन भारतीय टपाल सेवेचे नूतनीकरण करण्यात आले आहे. आसामा आणि हिमाचल प्रदेशासारख्या डोंगराळ परिसरात आता टपाल, पार्सल किंवा पत्राची डिलिव्हरी सायकलवरुन नाही तर चक्क ड्रोनच्या मदतीने केली जाणार आहे. याच्या मदतीने डोंगराळ भागात टपास सेवा पोहचवणे सोपे जाईल. ज्या भागांमध्ये पूर्वी रस्त्याने पोहोचणे अवघड आणि वेळखाऊ होते, तिथे सेवा पोहोचवण्यास आता ड्रोनच्या मदतीने अधिक गती मिळेणार आहे.याचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे जो सध्या चांगलाच ट्रेंडमध्ये आहे. व्हिडिओमध्ये ड्रोन घराबाहेर टपालाची डिलिव्हरी करताना दिसला. चला व्हिडिओत काय दिसले ते जाणून घेऊया.
India Post is taking to the skies! 📮🚁 Drone mail operations have begun in Assam, with 40 routes planned, alongside 110 in Himachal with Skye Air Mobility. One Himachal route has already cut a 2-hour journey to just 7 minutes. Even our oldest institutions can learn to fly! 🇮🇳 pic.twitter.com/uKqCdKRBiU
— Harsh Goenka (@hvgoenka) August 29, 2026
credit - social media and Twitter
02 Sep 2026 02:40 PM (IST)
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने कमानी अथवा शुभेच्छा फलक उभारू नयेत, अशा सूचना केल्या. त्यामुळे यंदाच्या उत्सवांच्या काळात शिंदे शिवसेनेच्या कमानी डोंबिवलीच्या प्रमुख रस्त्यांवर दिसणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. मनसेनेही या निर्णयाचे स्वागत केले आहे.
02 Sep 2026 02:30 PM (IST)
पुणे शिक्षक मतदारसंघातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वासू शिलेदार निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. शिंदे मुख्यमंत्री असतान त्यांचे ओएसडी म्हणून काम पाहणारे तसेच सध्या शिवसेनेतून आरोग्य दूत म्हणून काम करणारे मंगेश चिवटे हे पुणे शिक्षक परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्या उमेदवारी घोषणा त्यांनी केली आहे.
02 Sep 2026 02:27 PM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. भाजपच्या संघटनात्मक बदलांनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Modi Cabinet Reshuffle) यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा विस्तार आणि फेरबदल होण्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. संभाव्य फेरबदलात 15 ते 17 नव्या आणि तरुण चेहऱ्यांना संधी मिळू शकते, तर काही विद्यमान मंत्र्यांची खाती बदलली किंवा त्यांना मंत्रिमंडळातून वगळले जाऊ शकते, अशी अटकळ व्यक्त केली जात आहे. अश्विनी वैष्णव यांना अधिक महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे, तर नितीन गडकरी यांच्या खात्यात बदल होण्याचीही चर्चा आहे. मात्र, या संभाव्य बदलांबाबत केंद्र सरकार किंवा भाजपकडून अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.
02 Sep 2026 02:21 PM (IST)
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये, यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले उद्या महाडमध्ये मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करणार आहेत. अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेऊन रस्ते, पूल आणि पर्यायी मार्गाच्या नियोजनाचा आढावा घेतला जाणार आहे. लांजा, निवळी पूल खुले झाले असून चिपळूण उड्डाणपूलही लवकरच सुरू होणार आहे.
02 Sep 2026 02:10 PM (IST)
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या मोर्चाला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र, हाके मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. रवाना होण्यापूर्वी यवत येथे त्यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या 2 सप्टेंबरच्या GR ची होळी करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी यवत परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
02 Sep 2026 02:00 PM (IST)
चिपळूणमधील खडपोली येथील अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या पुलाच्या बांधकामाने महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. पुलाच्या फाउंडेशन आणि सबस्ट्रक्चरशी संबंधित बहुतांश महत्त्वाची कामे पावसाळ्यापूर्वीच पूर्ण करण्यात आली आहेत. त्यामुळे आता प्रकल्पाच्या पुढील टप्प्यातील कामांवर भर देण्यात येत आहे. पुलाच्या नदीपात्रातील सहा पिअर तसेच दोन्ही बाजूंच्या दोन अॅबटमेंटचे काम पूर्ण झाले आहे. नदीपात्रात काम करताना पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह आणि वाढणारी पातळी हे मोठे आव्हान असते. त्यामुळे ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण झाल्याने प्रकल्पातील महत्त्वाचा अडथळा दूर झाला आहे.
02 Sep 2026 01:55 PM (IST)
मराठी चित्रपटसृष्टीला नेहमीच प्रयोगशील दिग्दर्शक आणि विषय मिळाले आहेत. सध्या द्विधा हा मराठी चित्रपट चर्चेत आहे. दिग्दर्शक निलेश भास्कर नाईक यांनी आपल्या दिग्दर्शकीय पदार्पणात ‘द्विधा’ या चित्रपटातून एक संवेदनशील आणि वेगळा विषय मांडला आहे. दोन पिढ्यांमधील अंतर, जुन्या नात्यांमधील भावनिक ओलावा आणि आजच्या प्रॅक्टिकल जगण्यातील कायदेशीर व व्यावहारिक गणित यांचा सुंदर मेळ या चित्रपटात पाहायला मिळतो.
02 Sep 2026 01:50 PM (IST)
इस्रायल आणि हमास (Israel-Hamas War) यांच्यात सुरू असलेल्या भीषण संघर्षात इस्रायली संरक्षण दलाने (IDF) एक अत्यंत महत्त्वाची आणि धडक कारवाई करत हमासला मोठा दणका दिला आहे. उत्तर गाझामधील गाझा शहर परिसरात राबवलेल्या एका गुप्त आणि धाडसी मोहिमेदरम्यान इस्रायली सैन्याने हमासच्या अंतर्गत सुरक्षा विभागाचा प्रमुख मुईन अल-अरबीद (Muin al-Arbid) याला अटक केली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी या कारवाईला अधिकृत दुजोरा दिला असून, इस्रायली सैनिकांसाठी आणि गुप्तचर यंत्रणांसाठी हे एक ऐतिहासिक यश असल्याचे स्पष्ट केले आहे.
02 Sep 2026 01:45 PM (IST)
महाराष्ट्र शासन, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आणि महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था (MRRDA), पुणे यांच्या वतीने करार पद्धतीने विवक्षित कामांसाठी पात्र सेवानिवृत्त उप अभियंता आणि कार्यकारी अभियंता पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक आणि पात्र सेवानिवृत्त अभियंत्यांनी या भरतीचा लाभ घ्यावा. भरतीचा तपशील पाहता, कार्यकारी अभियंता या १ जागेसाठी ही भरती असून, कार्यालयाकडे प्राप्त विविध योजनांचे प्रकल्प अहवाल, निविदा मुदतवाढ इत्यादी प्रस्तावांची छाननी व कार्यालय प्रमुखांनी सोपवलेली अनुषंगिक कामे हे या पदाचे स्वरूप असेल.
02 Sep 2026 01:40 PM (IST)
महाराष्ट्राची ‘जीवनरेखा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) आर्थिक परिस्थिती आव्हानात्मक आहे. २०२३-२४ अखेरपर्यंत महामंडळाचा एकूण तोटा १०३२४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या आर्थिक संकटावर तोडगा काढण्यासाठी आणि एसटीला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम बनवण्यासाठी परिवहनमंत्री आणि एसटीचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली २ आणि ३ सप्टेंबर रोजी दोन दिवसीय विचारमंथन सत्र आयोजित केले जाणार आहे.
02 Sep 2026 01:35 PM (IST)
शहरातील अनेक भागांत पुरेसा पाणीपुरवठा होत नसताना महापालिकेने केलेली पाणीपट्टी करवाढ अन्यायकारक असल्याचा आरोप करत भाजप नगरसेवकांनी महासभेत तीव्र विरोध केला. एकीकडे नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे, तर दुसरीकडे वाढीव पाणीपट्टीचा आर्थिक भार सोसायट्या आणि नागरिकांवर टाकला जात असल्याने आधी नियमित पाणी द्या, त्यानंतरच करवाढीचा विचार करा, अशी आक्रमक भूमिका भाजपने घेतली. सोमवारी झालेल्या वसई-विरार महापालिकेच्या महासभेत पाणीप्रश्नावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. दावा केला जात प्रत्यक्षात अनेक भागांत अनियमित आणि अपुरा पुरवठा होत असल्याचे नगरसेवकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.
02 Sep 2026 01:30 PM (IST)
भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन चायना मास्टर्स स्पर्धेतून बाहेर पडला आहे. लक्ष्य पहिल्यात फेरीत कॅनडाच्या व्हिक्टर लाईकने लक्ष्यचा पराभव केला. २०२१ च्या जागतिक चॅम्पियनशिपमधील कांस्यपदक विजेता लक्ष्यने सामन्यात अनेक चुका केल्या. याचा फायदा जागतिक क्रमवारीत नवव्या क्रमांकावर असलेल्या व्हिक्टरने घेतला. लक्ष्यने हा सामना १४-२१, ७-२१ ने गमावला. दरम्यान, किदाम्बी श्रीकांतने आपला सामना जिंकून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.
02 Sep 2026 01:25 PM (IST)
नेपाळमध्ये (Nepal Flood) मुसळधार पाऊस आणि हिमनदी फुटल्यामुळे निर्माण झालेल्या विनाशकारी पूरस्थितीने अत्यंत भयंकर रूप धारण केले आहे. हिमालयातील या भीषण आपत्तीला एक आठवडा उलटून गेल्यानंतरही परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. नेपाळ पोलिसांच्या अधिकृत माहितीनुसार, पुराच्या पाण्यात बुडून आणि भूस्खलनामुळे मृतांचा एकूण आकडा १,१२७ वर पोहोचला आहे. आठ जिल्ह्यांमधून सुरक्षा दलांनी आणखी नवीन मृतदेह बाहेर काढले आहेत. या आपत्तीत अजूनही अंदाजे ४,००० हून अधिक लोक बेपत्ता असून, यामध्ये ५८३ परदेशी नागरिक आणि ८३ सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
02 Sep 2026 01:18 PM (IST)
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठी आनंदाची बातमी मिळाली आहे. कारखान्याचे संस्थापक आणि मार्गदर्शक आ. बबनदादा शिंदे यांनी दिवाळीनिमित्त सभासदांना १०० रुपयांचा अतिरिक्त हप्ता देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे शेतकरी सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गत गळीत हंगामात कारखान्याकडून ऊस उत्पादक सभासदांना एकूण ३,१२५ रुपये ऊसदर मिळाला आहे. त्यानंतर आता दिवाळीच्या निमित्ताने आणखी १०० रुपयांचा हप्ता जाहीर करण्यात आल्याने सभासदांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.
02 Sep 2026 01:11 PM (IST)
मुंबई उच्च न्यायालयाने दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणात मोठा निर्णय घेतला आहे. उच्च न्यायालयाने दिशा सालियनच्या मृत्यूची सीबीआय (CBI) चौकशी करण्याचे आदेश दिले असून, या प्रकरणात तात्काळ प्रथम माहिती अहवाल (FIR) नोंदवण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले आहेत. दिशाच्या मृत्यूनंतर सहा दिवसांनी, १४ जून २०२० रोजी, सुशांत सिंह राजपूतचाही मृतदेह आढळला. दिशाचे वडील, सतीश सालियन यांनी आपल्या मुलीच्या मृत्यूची नव्याने चौकशी आणि सीबीआय चौकशी करण्याची मागणी करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
02 Sep 2026 12:59 PM (IST)
शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालण्यासाठी मीरा-भाईंदर महानगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून दोन भव्य वास्तू उभारल्या. यामध्ये स्वर्गीय लता मंगेशकर नाट्यगृह आणि आप्पासाहेब धर्माधिकारी सभागृहाचा समावेश आहे. मात्र, लोकार्पणाला वर्ष उलटत नाही तोच या दोन्ही वास्तूंमध्ये विविध समस्या डोके वर काढू लागल्याने महापालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एकीकडे शहरातील कलाकार, नाट्यरसिक आणि नागरिकांसाठी दर्जेदार सुविधा देण्याचा दावा केला जात असताना दुसरीकडे नाट्यगृहाच्या वातानुकूलन व्यवस्थेचा प्रश्न वारंवार ऐरणीवर येत आहे. नाटकाच्या प्रयोगादरम्यान एसी व्यवस्था कोलमडल्याने कलाकारांना आणि प्रेक्षकांना उकाड्याचा सामना करावा लागतो. परिस्थिती इतकी गंभीर होते की, प्रयोगासाठी आलेल्या कलाकारांनाच प्रेक्षकांची माफी मागण्याची वेळ येते.
02 Sep 2026 12:57 PM (IST)
अँकर: एसटी बसमधून महिलांना मिळणाऱ्या ५० टक्के सवलतीसाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाविरोधात दोडामार्गात सर्वपक्षीय पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सवलतधारकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला असून, त्याची अंमलबजावणी १ सप्टेंबर २०२६ पासून करण्याचे जाहीर करण्यात आले. या निर्णयावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
02 Sep 2026 12:50 PM (IST)
खडपोली येथील बहुप्रतीक्षित पुलाच्या बांधकामाने आता महत्त्वाचा टप्पा गाठला असून, जानेवारीपर्यंत पूल पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला होईल, असा विश्वास संबंधित अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. पावसाळ्यापूर्वीच पुलाच्या फाउंडेशन व सबस्ट्रक्चरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची कामे पूर्ण करण्यात आल्याने सध्या पावसामुळे काहीसा व्यत्यय येत असला, तरी पुलाच्या उर्वरित कामाला टप्प्याटप्प्याने गती देण्यात येत आहे.
पुलाच्या नदीपात्रातील सहा पिअर आणि दोन्ही अॅबटमेंटचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तसेच नदीतील तीन स्पॅनसाठी १२ गर्डरचे लाँचिंगही पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे ही सर्व कामे पावसाळ्यापूर्वीच पूर्ण करण्यात आली. त्यामुळे पुलाच्या फाउंडेशनच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने असलेला अत्यंत महत्त्वाचा टप्पा वेळेत पार करण्यात यश आले आहे. परिणामी पुलाच्या संपूर्ण सबस्ट्रक्चरचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट साध्य झाले आहे. तीन स्पॅनवर डेक स्लॅबचे काम सुरू १२ गर्डर लाँचिंगनंतर आता नदीतील तीनही स्पॅनवर डेक स्लॅबचे काम प्रगतिपथावर आहे. त्याचबरोबर पुलाच्या दोन्ही बाजूंच्या अॅप्रोच रोडचे कामही सुरू आहे. पुलाचे मुख्य बांधकाम आणि जोडरस्ते अशी दोन्ही कामे समांतरपणे सुरू असल्याने प्रकल्प पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर पुलाच्या बांधकामात Prestressing सारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे.
02 Sep 2026 12:41 PM (IST)
राजापूर पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्यावतीने एकच कार्यक्रम घेऊन त्याची दोन वेगवेगळी बिले काढून शासनाच्या निधीचा गैरप्रकार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित प्रभारी प्रकल्प अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी केलेली असतानाही त्यांच्या या भ्रष्टाचारी कारभाराला आमचेच सत्ताधारी पाठीशी घालत असल्याचा आरोप भाजपा जिल्हा सरचिटणीस व उपसभापती अभिजित गुरव यांनी केला आहे.
02 Sep 2026 12:40 PM (IST)
संबंधित प्रकरणात ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली होती. मात्र, या मागणीच्या पार्श्वभूमीवर सरकारने उलट राहुल गांधी यांच्यावरच एफआयआर दाखल केल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. या कारवाईच्या निषेधार्थ चिपळूणमध्ये काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार निषेध व्यक्त केला.
राहुल गांधी यांनी सामाजिक न्याय आणि संविधानाच्या रक्षणाच्या दृष्टीने संबंधित प्रकरणात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यांच्या या भूमिकेवरच कारवाई करत त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
02 Sep 2026 11:45 AM (IST)
झिम्बाब्वे दौऱ्यात युवा खेळाडूंना संधी दिल्यानंतर, भारतीय निवड समितीने १३ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी एक मजबूत संघ जाहीर केला आहे. इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्धच्या पराभवानंतर संघात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.
02 Sep 2026 11:35 AM (IST)
नीट पीजीसारखी परीक्षा कोणत्याही वैद्यकीय विद्यार्थ्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. यासाठी उमेदवार वर्षानुवर्षे मेहनत करतात आणि परीक्षेच्या दिवशी संपूर्ण तयारीने सेंटरवर पोहोचतात. परंतु, तन्वीसाठी यावेळची NEET PG 2026 परीक्षा अत्यंत कठीण आणि भावनिक करणारी होती. तिचे आई-वडील नेपाळमधील पूरस्थिती दरम्यान कैलास यात्रेदरम्यान बेपत्ता झाले आहेत. असे असतानाही तन्वीने ३० ऑगस्ट रोजी परीक्षा दिली. तिने सांगितले की, तीन तासांच्या पेपरमध्ये सुमारे दीड तास ती रडत होती, पण तिने परीक्षा अर्धवट सोडली नाही.
02 Sep 2026 11:20 AM (IST)
अभिनेत्री आणि नृत्यांगना माधुरी पवारने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत गेल्या तीन वर्षांपासून आपल्याला होत असलेल्या त्रासाबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. सोशल मीडियावर चुकीच्या आणि अपमानास्पद कमेंट्स, फॅन पेज हॅक होणे, विकिपीडिया पेज डिलीट होणे आणि वर्किंग नंबरवर कॉल बॉम्बिंग करण्यात येत असल्याचा दावा माधुरीने केला आहे. या सगळ्यामुळे मानसिक त्रासासोबतच आपल्या सुरक्षिततेचीही चिंता वाटत असल्याचे तिने म्हटले आहे.
02 Sep 2026 11:15 AM (IST)
वैभव सूर्यवंशीने अगदी लहान वयातच क्रिकेट विश्वात मोठे यश मिळवले आहे. तो खेळत असलेल्या प्रत्येक मालिकेत किंवा स्पर्धेत एक मोठा विक्रम प्रस्थापित करतो. आपल्या लहान कारकिर्दीत, वैभव सूर्यवंशीने असे सहा विक्रम प्रस्थापित केले आहेत, जे मोडणे जवळपास अशक्य आहे. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत त्याने जगातली प्रत्येकाला आपला फॅन करून घेतलंय असं म्हटलं तर नक्कीच अतिशयोक्ती ठरणार नाही.
02 Sep 2026 11:10 AM (IST)
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले असून आज (2 सप्टेंबर) उपोषणाचा पाचवा दिवस आहे. पण वारंवार होणाऱ्या उपोषणामुळे यावेळी अवघ्या पाचव्या दिवशीच जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने मराठा समाजात संतापाची लाट उसळली आहे. जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालल्याने आणि सरकार आंदोलनाची दखल घेत नसल्या आरोप करत मराठा बांधवांनी बीड आणि जालना जिल्ह्यांत रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन केले. काही ठिकाणी टायर जाळून निषेध करण्यात आल्याने दोन्ही जिल्ह्यांत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
02 Sep 2026 11:05 AM (IST)
ठाण्यातील रेमंड रहिवासी संकुलात सलग दुसऱ्या वर्षी ‘युवा स्टार प्रतिष्ठान’च्या वतीने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या उत्सवात ११ थर रचणाऱ्या गोविंदा पथकासाठी तब्बल २१ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. तर १० थरांसाठी ५ लाख, ९ थरांसाठी २ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.
02 Sep 2026 11:01 AM (IST)
काँग्रेस नेते राहुल गांधी आज नाशिक दौऱ्यावर आहेत. ओझर विमानतळावरून ते गंगापूर धरणाजवळील एमटीडीसी रिसॉर्टकडे रवाना झाले आहेत. काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत आयोजित प्रशिक्षण शिबिराच्या समारोप कार्यक्रमाला राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत. सकाळी ११ वाजता ते एमटीडीसी रिसॉर्टमध्ये पोहोचण्याचे नियोजन आहे.
02 Sep 2026 10:59 AM (IST)
वडिलांकडून मुलाचा खून अन् मुलाकडून आईचा खून झाल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना शहरात ताज्या असतानाच, मुलाने कोणतेही कारण नसताना जन्मदात्या आईला बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. हातातील गोल कड्याने तोंडावर प्रहार केल्याने संबंधित ज्येष्ठ महिला गंभीर जखमी झाली असून त्यांच्या ओठाला तब्बल ८ टाके पडले आहेत.
02 Sep 2026 10:50 AM (IST)
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात हुंड्याच्या मागणीवरून विवाहितेचा छळ केल्याचा आरोप असलेली धक्कादायक घटना समोर आली आहे. गायी-म्हशी खरेदी करण्यासाठी माहेरहून १० लाख रुपये आणावेत, अशी मागणी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या मागणीवरून शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागल्याचा आरोप असून, उपचारादरम्यान २५ वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाला. या प्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध युसूफ वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






