फोटो सौजन्य -iStock
राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आज सातारा आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. सातारा आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यांसाठी पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. या जिल्ह्यांना आज हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडा असे, आवाहन देखील हवामान विभागतर्फे करण्यात आलं आहे. प्रशासनाने दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. तसेच आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हेदेखील वाचा- मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; माटुंगा स्थानकावर ओव्हरहेड वायर तुटली; प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकवरून पायी प्रवास
सिंधुदर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक या जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर नंदूरबार, धुळे, जळगाव, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, अमरावती या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत आज मुसळधार पाऊस बरसणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर सातारा आणि रायगड या जिल्ह्यांना पुढील 24 तासांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील घाट भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सातारा आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यांना आज हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.
हेदेखील वाचा- पुणेकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी ‘या’ परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार
पुण्यात आज ढगाळ वातावरण राहणार आहे. तर पुण्यातील काही भागांत आज हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावासाची शक्यता आहे. पालघर, ठाणे आणि पुण्याच्या घाट विभागात उद्या 25 जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. 26 आणि 27 जुलै रोजी कोकण, पुणे व सातारच्या घाट विभागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे पुढील 3 ते 4 दिवस राज्यात पावासाचा जोर कायम राहणार असल्याचं सागितलं जात आहे. मुंबई, ठाणे, कल्याण आणि पुण्यात आज वाऱ्याचा ताशी वेग 45 ते 55 किलोमीटर राहणार असल्याचा अंदाज आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसाचा सर्वात जास्त परिणाम रेल्वे आणि रस्ते वाहतूकीवर होत आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत होत असून रस्त्यांवर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचतं आहे. त्यामुळे मुंबईकरांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.