फोटो सौजन्य - सोशल मिडीया
मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकावर ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याचं समोर आलं आहे. ओव्हर हेड वायरवर बांबू ती तुटल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या सर्व फास्ट लोकल माटुंगा रेल्वे स्थानकावर खोळंबल्या आहेत. तर यामुळे इतर रेल्वेगाड्या देखील उशारीने धावत असल्यांच पाहायला मिळत आहे. ओव्हरहेड वायर तुटल्याचा परिणाम लांब पल्ल्यांच्या एक्सप्रेस गाड्यांवर देखील झाला आहे. एक्सप्रेस गाड्या देखील माटुंगा रेल्वे स्थानकावर थांबल्या आहेत. गाड्यांचा खोळंबा झाल्याने अखेर आता प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवरून पायी चालण्यास सुरुवात केली आहे.
हेदेखील वाचा – पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, चर्चगेट स्थानकात ओव्हरहेड वायरवर अडकले जॅकेट
ओव्हरहेड वायर तुटल्याने जलद मार्गावरील गाड्या सुमारे 30 ते 35 मिनिटे माटुंगा रेल्वे स्थानकावर अडकल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांचा देखील मोठ्या प्रमाणात खोळंबा झाला होता. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवरून पायपीट करण्यास सुरुवात केली. यानंतर ओव्हरहेड वायरचं काम हाती घेण्यात आलं. ओव्हरहेड वरील बांबू काढण्यात यश आलं आहे. मात्र अद्यापही लोकलसेवा पूर्वपदावर आलेली नाही. जलद गाड्या धिम्या मार्गावर वळण्यात आल्या. याचा फटका धिम्या मार्गावरील लोकल गाड्यांना बसला. सीएसएमटीकडे जाणाऱ्या धिम्या मार्गावरील गाड्यांची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशीराने सुरु आहे. सकळाच्या वेळी मुंबईकरांची कामावर जाण्याची घाई असतानाच रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.
हेदेखील वाचा – मुंबई पुण्यात आज ऑरेंज अलर्ट जारी; जाणून घ्या तुमच्या शहरातील हवामान अंदाज
मध्य रेल्वेच्या माटुंगा रेल्वे स्थानकाजवळच एक कन्स्ट्रक्शन साईट आहे. या साईटवरील कामासाठी बांबूचा वापर केला जातो. यातील काही बांबू माटुंगा रेल्वे स्थानकाच्या ओव्हरहेड वायर वर पडले आणि वायर तुटली. या घटनेमुळे कोणतीही जिवीतनाही झाली नसली, तरी प्रवाशांचे मात्र मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. कामावर जाणाऱ्या नागरिकांनी रेल्वे रुळावरून पायपीट करावी लागत आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सोमवारपासून सतत मध्य रेल्वेच्या वाहतूकीवर परिणाम होत असल्याचं पाहायला मिळत आहे. कधी पाऊस तर कधी सिग्नल यंत्रणेतील बिघाड. या सर्व कारणांमुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांना रोज मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.