राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या स्वराज शिंदेची छाप; वसईच्या खेळाडूची दमदार कामगिरी; सुवर्ण आणि रौप्यपदकाची कमाई
मुंबई : ६२व्या राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या स्वराज मच्छिंद्र शिंदेने नवा राष्ट्रीय विक्रम रचताना एक सुवर्ण आणि एका रौप्य अशा दोन पदकांची कमाई केली. कर्नाटकमधील म्हैसूर, बंगळुरू आणि कोईम्बतूर येथे सुरू असलेल्या स्पर्धेत डीएम स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेणारा आणि वसई येथील विद्या विकासिनी आयसीएसई स्कूलचा विद्यार्थी असलेल्या स्वराजने वन लॅप क्वार्ड्स स्केटिंग प्रकारात एक सुवर्ण कामगिरी केली.
नवा विक्रम केला प्रस्थापित
वन लॅप क्वार्ड्स रोड स्केटिंग प्रकारामध्ये त्याने दुसरे स्थान मिळवले. स्वराजने २६.६४ सेकंद अशा वेळेसह यंदा नवा स्पर्धा विक्रमही नोंदवला. मागील वेळ २६.९८ सेकंद अशी होती. २०२२ मध्ये बंगळुरू येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत स्वराज सहभागी झाला होता. मात्र, पदक मिळाले नव्हते. याच वर्षी मे महिन्यात गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय खुल्या रोलर स्केटिंग स्पर्धेत 2 कांस्यपदके मिळवल्याने त्याचा आत्मविश्वास उंचावला.
डीएम स्पोर्ट्स अकॅडमीचा विद्यार्थी
स्वराज हा वसई येथील डीएम स्पोर्ट्स अकॅडमीचा विद्यार्थी असून यंदाच्या राष्ट्रीय स्पर्धेपूर्वी प्रशिक्षक डिक्सन मार्टिन यांनी त्याच्याकडून चांगला सराव करून घेतला. स्पर्धेपूर्वी, ३० दिवस ते त्याच्याकडून रोज पहाटे ४.३० वाजता सराव करवून घ्यायचे. दोन तासांच्या सरावानंतर स्वराज ६.४० वाजता तिथून थेट शाळेला जायचा. परीक्षेतही त्याचे हेच वेळापत्रक होते. मेहनतीचे फळ त्याला मिळाले. त्यात कोच मार्टिन यांचाही मोठा वाटा आहे, असे स्वराजचे वडील मच्छिंद्र यांनी सांगितले. राष्ट्रीय स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीबद्दल स्वराजचे वसईसह संपूर्ण राज्यभरातून कौतुक होत आहे.