सदा सरवणकर निवडणूक लढण्यावर ठाम (फोटो- ट्विटर)
मुंबई: महाराष्ट्रातील माहीम विधानसभा जागेवरून सध्या राजकीय गोंधळ सुरू आहे. या जागेवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणूक लढवत आहेत. दुसरीकडे महायुतीकडून एकनाथ शिंदे यांचा पक्ष शिवसेनेचे सदा सरवणकर रिंगणात आहेत. आता उमेदवारी मागे घेतल्यास विधान परिषद आणि मंत्रीपदाचा मान राखू, असा प्रस्ताव महायुतीच्या वतीने सदा सरवणकर यांना देण्यात आल्याचे समजते आहे. दरम्यान आता अर्ज मागे घेण्याची वेळ संपल्याने माहीममधून सदा सरवाणकर हे निवडणूक लढणार आहेत. माहीममध्ये आता तिरंगी लढत पहायला मिळणार आहे.
माहीम विधानसभा मतदारसंघातील तिढा सोडवण्यासाठी सदा सरवणकर हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सदा सरवणकर यांची भेट नाकारली आहे. तसेच उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत देखील संपली आहे. त्यामुळे सदा सरवणकर हे निवडणूक लढणार आहेत हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता माहीममध्ये अमित ठाकरेंचे काय होणार? जनता कोणाला साथ देणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
माहीम मतदारसंघातून राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. लोकसभेला महायुतीला राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता. आता युती धर्म म्हणून भाजपने व शिवसेनेने अमित ठाकरे यांना मदत करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सदा सारवाणकर यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू होते.
सदा सरवणकर यांनी राज ठाकरे यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांनी शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. मात्र राज ठाकरे यांनी सदा सरवणकर यांची भेट नाकारली. मला आता यावर काहीही बोलायचे नाही. तुम्हाला उभे राहायचे असेल. लढायचे असेल तर तुम्ही लढा असे राज ठाकरे म्हणल्याचे समजते आहे. “मी माझ्या मनाची तयारी केली होती. मात्र राज ठाकरे यांनी भेटच नाकारली. त्यामुळे माझ्या नाईलाज आहे. त्यामुळे आता मी ही निवडणूक लढणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन केला होता. दादरमधून धनुष्यबाण आणि बाळासाहेबांचे विचार विधानसभेत जाणं गरजेचं आहे. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी माझी इच्छा आहे. ही निवडणूक माझ्यासाठी वैयक्तिक नाही. ही निवडणूक माझ्यासाठी वैयक्तिक नाही. शिवसैनिक अहोरात्र मेहनत घेत आहेत, त्यांना विचारलं. एकनाथ शिंदेंची इच्छा आहे, मनसेने आमच्याविरुद्ध असलेले इतर सर्व उमेदवार मागे घ्यावेत, ही मी टाकलेली अट मान्य होत असेल, तर कार्यकर्त्यांशी बोलून अंतिम निर्णय कळवेन, असं सरवणकर म्हणाले होते.
पदाधिकाऱ्यांचे ५० ग्रुप केले आहेत. त्या सगळ्यांना बोलावलं आहे. चर्चा करून निर्णय घेऊ. एका सीटमुळे वातावरण खराब होऊ नये असं वाटतं. शिंदेंनी मला एकदाही मागे घ्यायला सांगितलेलं नाही. राज साहेबांविषयी आमच्या मनात प्रेम आहे. महायुतीचे आमदार वाढावेत, हीच इच्छा आहे. हा त्याग एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदापर्यंत न्यायला कामी येईल. मोठे निर्णय घेताना एखादा बळी जातो, असं सदा सरवणकर म्हणाले होते.