संग्रहित फोटो
दरम्यान, उमेदवारीपासून वंचित राहिलेल्या भाजपच्या इच्छुकांनी आता महायुतीला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र आहे. भाजपाचे निष्ठावंत आणि माजी उपनगराध्यक्ष महावीर जैन यांनी प्रभाग क्रमांक १६ मध्ये उमेदवारी न मिळाल्याने शिवशाहू आघाडीत प्रवेश करून स्वत: व पत्नीला उमेदवारी पदरात पाडून घेतली. दीर्घकाळ भाजपाशी एकनिष्ठ राहूनही उमेदवारी नाकारल्यामुळे अनेकांनी उघडपणे बंडाचा झेंडा हाती घेतला. या घटनेमुळे भाजपच्या अंतर्गत गटबाजीची चर्चा अधिक तीव्र झाली आहे. एकूणच, उमेदवारी निश्चितीच्या प्रक्रियेनंतर भाजप व महायुतीतील नाराज घटक उघडपणे मैदानात उतरू लागल्याने इचलकरंजीतील राजकारण तापले आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीला खरोखरच बंडाळी लागते की नेतृत्व वेळेत परिस्थिती सावरते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
‘एकनिष्ठ परिवर्तन आघाडी’चा उदय
माजी आमदार व भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते दीपक पाटील यांनाही उमेदवारी डावलण्यात आल्याने त्यांची नाराजी लपून राहिली नाही. दीपक पाटील भाजपाच्या संघटनात्मक कामात सक्रिय असूनही त्यांना संधी न मिळाल्याने अस्वस्थता वाढली आहे. त्यांच्या समवेत भाजपातील निष्ठावंत कार्यकर्त्यांचा एक गट आता उघडपणे विरोधी भूमिकेत जाताना दिसत आहे. या नाराज गटाने विरोधी ‘एकनिष्ठ परिवर्तन आघाडी’कडून निवडणूक लढवत महायुतीला धडा शिकवण्याचा निर्धार केल्याची चर्चा आहे.
अधिकृत उमेदवारांना बंडखाेरांचे आव्हान
केवळ अपक्ष उमेदवारीपुरते मर्यादित न राहता, संघटितपणे निवडणूक रणांगणात उतरण्याची तयारी सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. त्याच अनुषंगाने नाराजांची फळी बांधण्याचे काम वेगाने सुरू झाले असून, प्रत्येक प्रभागात महायुतीविरोधी रणनीती आखली जात आहे. इचलकरंजीत पक्षांपेक्षा स्थानिक नेते, गट आणि व्यक्तिगत प्रभाव अधिक महत्त्वाचा ठरत असून, बंडखोरांच्या हालचाली महायुतीसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. अधिकृत उमेदवारांपुढे आता विरोधकांइतकाच अंतर्गत बंडखोरीचा धोका निर्माण झाला आहे. तिरंगी किंवा चौरंगी लढती झाल्यास महायुतीच्या मतांचे विभाजन होऊन त्याचा थेट फटका निकालावर बसू शकतो.






