File Photo : ST Bus
नागपूर : दिवाळी भेट सोडा, सणाआधी एसटी कर्मचाऱ्यांना वेतनही देण्यास टाळाटाळ केली जात असल्याची माहिती मिळाली आहे. सानुग्रह अनुदान मिळणार की नाही, अशी चिंता वाटत असतानाच आता आचारसंहितेचे कारण देत वेतनही दिवाळीपूर्वी देण्यास टाळाटाळ केली जात आहे. महिनाभर काम केल्यावर वेतन मिळते, त्याचा आचारसंहितेशी संबंध काय? असा सवाल महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी प्रशासनाला केला आहे.
हेदेखील वाचा : आमदार रवींद्र धंगेकरांनी 100 कोटींची वक्फ बोर्डाची मालमत्ता हडपली, गणेश बीडकर यांचा आरोप
दिवाळी सण तोंडावर आल्याने राज्यभरातील सर्वच शासकीय कर्मचारी व अधिकारी यांना दिवाळी सण आनंदात साजरा करता यावा, यासाठी दिवाळीपूर्वी वेतन देण्याच्या सूचना राज्य शासनाकडून करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी वेतनही देण्यात आले आहे. त्याच धर्तीवर एसटी कर्मचारी व अधिकारी यांना दिवाळीपूर्वी वेतन मिळावे, यासाठी सरकारकडून 350 कोटी रुपयांची सवलत मूल्य परतावा रक्कम देण्यात आली आहे.
एकीकडे एसटी कर्मचारी व अधिकाऱ्याना दिवाळी भेट रक्कम मिळण्याची शक्यता धूसर झाली असतानाच आता वेतनही दिवाळीपूर्वी मिळणार की नाही अशी शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. कर्मचाऱ्यांनी महिनाभर काम केल्यावर संबंधित महामंडळ, शासनाकडून वेतन मिळते.
दिवाळीपूर्वी वेतनासह बोनसची केली जातीये मागणी
एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांकडून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महामंडळ व प्रशासनाकडे दिवाळी बोनस आणि दिवाळीपूर्वी वेतनाची मागणी केली जात आहे. त्याचा व आचारसंहितेचा संबंध नसून प्रशासनाने तत्काळ कर्मचारी व अधिकाऱ्याना वेतन द्यावे, अशी मागणीही आता केली जात आहे.
आचारसंहितेचे दिलं जातंय कारण
आचारसंहितेची भीती वाटत असल्याने वेतन उशिरा दिले जाणार असल्याची माहिती आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आचारसंहिता नाही. प्रशासनाने तातडीने पाऊल उचलून दिवाळीपूर्वी प्रश्न न सोडवल्यास कर्मचाऱ्यांकडून संघर्ष केला जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
हेदेखील वाचा : CA Foundation, Intermediate निकाल ‘या’ तारखेला जाहीर होणार ! ICAI कडून देण्यात आली निकाल्याच्या अपेक्षित तारखेची माहिती