गणपतीपुळ्याला निघाल्या कारचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
ओंकार खंडागळे, हरिश सुरेश वाघमारे (रा. पडळ, ता. खटाव), प्रतिक रमेश धावणे (रा. चंद्रपूर) हे तिघेही एका खासगी बांधकाम कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत आहेत. १४ जून रोजी सुट्टी असल्याने ते शनिवारी रात्री कोरेगावहून गणपतीपुळे येथे जाण्यासाठी ओंकार यांच्या मालकीच्या एमएच १४ डीए ६६०० क्रमांकाच्या शेव्हरेलो क्रुज कारने रवाना झाले होते.
मध्यरात्री सुमारे १२.४५ वाजण्याच्या सुमारास कवठे फाटा वळणावर वाहनाचा वेग अधिक असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. कार रस्त्याच्या कडेला जाऊन खड्ड्यात घुसली. पलट्या खात अंदाजे ३०० फूट अंतरावर शेतात जाऊन पडली. भीषण अपघातामुळे कारचे मोठे नुकसान झाले.
या दुर्घटनेत ओंकार खंडागळे यांना गंभीर जखमी झाल्याने त्यांना कराडला उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्रतिक रमेश धावणे यांच्यावर कराडच्या सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हरिश वाघमारे यांना किरकोळ दुखापत झाली आहे.या अपघाता विषयी हरिश वाघमारे यांनी मसूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवल्यामुळे हा अपघात घडल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. सदर प्रकरणी मसूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक आदिनाथ खरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुधाकर भोसले पुढील तपास करीत आहेत.
मध्यरात्री अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक तातडीने घटनास्थळी धावले. त्यांनी जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. अपघाताची माहिती मिळताच मसूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार सुधाकर भोसले, हवालदार बाळासाहेब कोळेकर, संजय काटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांसह पोलिसांनीही तात्काळ तत्पूर्ता दाखवली. पोलिसांनी १०८ रुग्णवाहिकेच्या साहाय्याने सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात हलविले. अपघातग्रस्तांच्या उपचारांसाठी मसूर पोलीस ठाण्याचे संजय काटे यांचेही प्रयत्न महत्वपूर्ण ठरले.






