संग्रहित फोटो
पुणे : पुणे शहरात सुरु असलेल्या विविध प्रकल्पांच्या कामावर चिंता व्यक्त करीत भाजपच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी एकप्रकारे सत्ताधारी भाजपच्या कारभारवर टिका केली आहे. मात्र, पुण्यातील समस्या न सुटण्यामागे प्रशासनाचे अपयश असल्याचा दावा त्यांनी केला आहे. शुक्रवारी खासदार कुलकर्णी यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेत, शहरातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. यामध्ये वाहतूक कोंडी, अतिक्रमण, नदी सुधार प्रकल्प, अनधिकृत रूफटॉप हॉटेल्स, तसेच उड्डाणपुलाच्या रखडलेली कामे आदींचा समावेश होता. या भेटीनंतर खासदार कुलकर्णी यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पुण्यातून हडपसरला पोहोचायला जितका वेळ लागतो, तितक्याच वेळेत एखादा प्रवासी मुंबईत पोहोचतो, ही शहराची शोकांतिका असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. नागरी जीवनमान दिवसेंदिवस खालावत चालले असून, विकास आराखड्याच्या केवळ २५ टक्के अंमलबजावणी झाली आहे. रस्त्यांची कामे झाली नाहीत, रुंदीकरण झाले नाही, त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत, असे त्यांनी नमूद केले. मार्केटयार्डमधील गंगाधाम चौकात वारंवार होणारे अपघात चिंतेचा विषय आहेत. या ठिकाणी उड्डाणपुलाच्या कामाला एक वर्षांपूर्वी मंजूरी मिळाली असूनही प्रत्यक्षात काम सुरू झालेले नाही. पुलाच्या कामात अडथळे आणणारे ‘झारीतील शुक्राचार्य’ कोण आहेत? असा थेट सवाल डॉ. कुलकर्णींनी उपस्थित केला. विशेष म्हणजे हा परिसर भाजपा नेत्या व नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या पर्वती मतदारसंघात येतो.
नदीकाठ सुधार प्रकल्पावरही टीका
भाजपकडून नदीकाठ सुधार प्रकल्प, जायका प्रकल्पाच्या कामाचे श्रेय घेतले जाते. परंतु खासदार कुलकर्णी यांनी नदीकाठ सुधार प्रकल्पाच्या कामावर नाराजी व्यक्त केली. शहरातील नद्या ही हजारो वर्षांची नैसर्गिक ठेव आहे. मात्र नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली नदीपात्र आकुंचित केले जात आहे. नाईक बेटाजवळील प्रवाह बंद करून पूरस्थितीला आमंत्रण दिले जात आहे. भविष्यातही नद्या नाल्यांमध्ये रूपांतरित होतील, असा इशाराही त्यांनी दिला. नदीकाठावरील बांधकामांना नैसर्गिक ‘ब्ल्यू आणि रेड लाईन’नुसारच परवानग्या द्याव्यात, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
खासदार कुलकर्णी यांना गेल्या ११ वर्षांपासून केंद्रात व ९ वर्षांपासून राज्यात भाजपची सत्ता असून, पुण्यातही भाजपचे बहुमत असतानाही नागरी समस्या सुटलेल्या नाहीत असे वाटते का ? असे विचारले असता, त्यांनी याचे खापर प्रशासनावर फोडले. नागरी प्रश्न सुटले नाहीत हे प्रशासनाचे अपयश आहे. मी पक्षाच्या पलीकडे जाऊन पुणेकरांच्या हितासाठी बोलत आहे. आमच्या पक्षाचे इतर आमदार, खासदार हे देखील महापालिका आयुक्तांची स्वतंत्र भेट घेऊन सातत्याने चर्चा करीत आहेत. सर्वांनी एकत्रितपणे आयुक्तांशी चर्चा केली पाहीजे, असे मला वाटते, असे त्या म्हणाल्या
अनधिकृत रूफटॉप हॉटेल्सवर कारवाईची मागणी
कल्याणीनगरमधील काही रूफटॉप हॉटेल्स, क्लब्समध्ये बेकायदा धंदे सुरू असून, अमली पदार्थांचे सेवन व नियमबाह्य संगीत यामुळे रहिवाशांना त्रास होत असल्याच्या तक्रारी ५० पेक्षा अधिक सोसायट्यांकडून प्राप्त झाल्या आहेत. या प्रकरणात महापालिका व पोलिस प्रशासन दोघांचीही जबाबदारी आहे. मात्र अद्याप ठोस कारवाई झालेली नाही, अशी नाराजी कुलकर्णींनी व्यक्त केली.