सौजन्य - नवराष्ट्र टीम
नंदुरबार : राज्यात सध्या लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू असून महायुतीकडून याचा जोरदार प्रकार केला जात आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून या योजनेच्या प्रचार खर्चावरून सरकारवर टीका केली आहे. दरम्यान अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांनी या योजनेवरून सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे. सुप्रिया सुळे यांचे उत्पन्न अडीच लाखाच्या आत असेल तर त्यांनाही राज्य सरकार लाडकी बहीण योजनेचा लाभ देईल, त्यांनाही सरकारकडून १५०० रुपये दिले जातील. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास लाडकी बहीण योजना बंद पाडेल, अशी टीकाही त्यांनी महाविकास आघाडीवर केली आहे.
महिलांना पैसे देऊन मते मिळवण्याचा प्रकार म्हणजे ही योजना असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे, यावर अनिल पाटील म्हणाले, ही महिलांना दिलेली लाच देत नसून भाऊबीजेची ओवाळणी आहे. उद्धव ठाकरे याला लाच म्हणून महाराष्ट्रातील तमाम महिलांचा अपमान केला आहे. महायुती सरकारने शेतकऱ्यांना वीज मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र महाआघाडीचे सरकार आल्यानंतर ही योजना रद्द केली जाईल. यासाठी राज्यातला शेतकरी, युवक व महिलांनी आमचे सरकार पुन्हा आणण्याचे काम करावे.
सुप्रिया सुळे काय काय म्हणाल्या होत्या?
बहिणीचं नातं आमच्या भावाला कळलंचं नाही. प्रेमात पैसे आले की ते नातं होतं नाही. प्रेमात आणि व्यवसायामध्ये माझ्या भावांनी गल्लत केली. बहिणीचं नातं हे 1500 रुपयात विकत घेता येत नाही. त्यांचं नातं फक्त मताशी जोडलेलं आहे. व्यवसायात प्रेम नसते. जर प्रेमात पैसे आले तर त्याला नातं म्हणता येत नाही. त्यामुळे महाराष्ट्र सरकारचे दुर्दैव आहे की, त्यांना व्यवसाय आणि प्रेमातले अंतर कळले नाही. ते म्हणतात की, एक बहीण गेली तरी हरकत नाही दुसऱ्या बहिणी आणू. पंधराशे रुपयाला या राज्यातलं नातं बिकाऊ नाही? हा आमच्या नात्याचा अपमान आहे. निरागस असणारा बहिण भावाच्या प्रेमाला किंमत लावायचे पाप या महाराष्ट्राच्या सरकारने केले आहे.