तुळजापूरमधील भवानी माता मंदिर (फोटो- सोशल मिडिया)
मुंबई: तुळजापुरच्या भवानी माता मंदिराची स्ट्रक्चरल ऑडिटनुसार कामे ठरविण्यापुर्वी देवस्थानाचे पुजारी, तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट, स्थानिक आमदार यांच्यासोबत बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे ॲड. शेलार यांनी सांगितले. यासंदर्भात सर्व संबंधित घटकांशी चर्चा करुन कामाची आखणी करण्यात येईल असेही ॲड शेलार यांनी सांगितले. त्या संदर्भात आज मंत्रालय येथील दालनात बैठक झाली.
सांस्कृतिक कार्य विभागातर्फे पुरातत्व विभागामार्फत तुळजापुरच्या भवानी मातेचे मंदिर राज्य संरक्षित इमारत म्हणून घोषित करण्यात आले आहे. मंदिराच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट आला असून त्यानुसार पुढील कामाची दिशा निश्चित केली जाणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले. हा अहवाल शासनाला सादर करण्यात येणार आहे. तसेच मंदिराच्या परिसरात सध्या दोन एजन्सीमार्फत दुरुस्ती आणि डागडुजीचे काम सुरु आहे. यामध्ये समन्वय साधून त्यांच्याकडून कालबद्ध नियोजन घेण्याचे निर्देश ॲड.शेलार यांनी दिले.
तुळजाभवानीच्या मंदिरात देखील ड्रेस कोड लागू करण्याची मागणी
काही दिवसांपूर्वी सिद्धीविनायक मंदिरात प्रेवश करतााना भाविकांनी पारंपारिक पोशाख परिधान करुन यावं असा निर्णय मंदिराच्या व्यवस्थापनाने दिला. धार्मिक स्थळांना भेट देताना आपल्या संस्कृतीचं पालन व्हावं हा हेतू असल्याचं मंदिराच्या विश्वस्तांनी सांगितलं आहे. याचपार्श्वभूमीवर आता आई तुळजाभवानीच्या मंदिरात देखील भाविकांनी पारंपारिक पोशाख परिधान कारावा अशी मागणी करण्यात आली आहे. ही मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाकडून निवेदनद्वारे मागणी करण्यात आली आहे.
विविध तीर्थक्षेत्र विकासासाठी 305 कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
श्री क्षेत्र पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी मंदीर परिसरात भाविक आणि पर्यटकांसाठी दर्शन मंडप व दर्शन रांग सुविधा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 129 कोटी 49 लाख रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. भगूर (जि. नाशिक) येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित थीमपार्क साकारण्यात येणार आहे. त्यासाठीच्या 40 कोटी रुपयांच्या प्रस्तावास तसेच पहिल्या टप्प्यातील 15 कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली. अमळनेर (जि. जळगांव)येथील देशातील एकमेवाद्वितीय अशा मंगळग्रह देवस्थानाच्या 25 कोटींच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली.
सातारा जिल्ह्यातील कोयना जलाशय-मौजे मुनावळे येथील जलक्रीडा पर्यटन सुविधा (ता.जावळी, जि.सातारा)साठी 47 कोटी रुपयांच्या अतिरिक्त मागणीस मान्यता देण्यात आली. हे सर्व प्रस्ताव पर्यटन विभागाने सादर केले. त्याबाबत सविस्तर सादरीकरण व त्यातील प्रकल्प आणि सुविधांची माहिती सादर केली. ग्रामविकास विभागाने सादर केलेल्या अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी ऋणमोचन येथील 18 कोटींच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली. तसेच श्री क्षेत्र गहिनीनाथगड (जि. बीड) च्या विकास आराखड्यातील 2 कोटी 67 लाखांच्या कामांस मान्यता देण्यात आली.