भाजप आमदार राहुल कुल (फोटो- ट्विटर)
दौंड: राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. लवकरच उमेदवारांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र काही मतदारसंघात चुरशीची आणि रंगतदार लढती पाहायला मिळणार आहेत. दौंड विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार यांना उमेदवारी मिळाली तर तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
राज्यात विधानसभेचे बिगुल वाजले आहे. इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. दौंड विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार राहुल कुल पुन्हा एकदा तिसऱ्यांदा आमदार होण्यासाठी सज्ज झाले आहेत. तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष आणि माजी आमदार रमेश थोरात हे महायुतीला धक्का देण्याची तयारीत आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवण्याची इच्छा थोरात यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सह महायुतीत खळबळ उडाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या दौंड तालुक्यातील काही कार्यकर्त्यांनी थोरात यांना उमेदवारी देऊ नये, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे थोरात यांचा पक्षप्रवेश सध्या लांबणीवर असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निर्णयाकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. परिणामी थोरात यांच्या आगामी राजकीय भवितव्याबाबत अनेक संभ्रम निर्माण झाले असून थोरात हे ठोस असा राजकीय निर्णय घेत नसल्याने ऐनवेळी त्यांची मोठी गोची निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
परिणामी थोरात यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. भाजप आमदार राहुल कुल यांना पक्षाची उमेदवारी जवळ जवळ निश्चित मानली जात असल्याने ते निवडणुकाला समोरे जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. मागील काही दिवसापासून त्यांनी तालुक्यात विविध विकास कामांचा उद्घाटनाचा सपाटा लावला होता. तालुक्यात कोट्यवधी रुपयांची विकास कामे मार्गी लावल्याचा दावा कुल करीत आहेत. तर तालुक्यात विकास कामांचा केवळ पोकळ गप्पा असून निकृष्ट दर्जाची कामे झाली असून आपल्याच बगलबच्चांना जगवण्याचे काम कुल यांनी आतापर्यंत केले आहे, असा आरोप विरोधक करीत आहेत. तर दुसरीकडे रमेश थोरात यांनी निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी केली खरी!, पण सध्या कोणत्या पक्षाकडून उभारायचं कोणत्या चिन्ह घेऊन मतदानच्या समोर जायचं हे अद्याप निश्चित नसल्याने सध्या तरी थोरात यांना ही निवडणूक राजकीय दृष्ट्या अडचणीची ठरवत आहे.
…तर रमेश थोरात यांचा मार्ग मोकळा
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार यांची नाराजी दूर केल्यास रमेश थोरात यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाचा प्रवेशाचा मार्ग मोकळा होणार आहे. मात्र आप्पासाहेब पवारांचे समर्थक थोरात यांना पक्षात घेण्यास विरोध करत आहेत. दरम्यान, भाजप आमदार राहुल कुल यांना टक्कर द्यायचे असेल तर माजी आमदार रमेश थोरात हे उमेदवार असायला हवेत, असे अनेक राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
तालुक्यात शरद पवार गटाला मानणारा वर्ग
भाजप आणि आमदार राहुल कुल यांच्यावर तालुक्यात प्रचंड नाराजी आहे. तर शरद पवार यांच्या पक्षाला मानणारा वर्ग दौंड तालुक्यात वाढला आहे. लोकसभेनंतर तालुक्यात शरद पवार पक्षाकडे मतदार पसंती देत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षातील अनेक कार्यकर्त्यांचं रमेश थोरात यांना उमेदवारी द्यावी, असे मत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे हे काय निर्णय घेतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.