आटपाडी : आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी (Atpadi Agricultural Produce Market Committee Election) रविवारी मतदान झाले. सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी आघाडीच्या विरोधात शिवसेना, काँग्रेस, रासप यांच्यात कमालीचा संघर्ष होताना दिसला. मात्र, या निवडणुकीदरम्यान आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी ग्रामपंचायत सदस्याला कानाखाली लावल्याचा प्रकार घडला आहे.
मतदान केंद्रावर सकाळपासून रांगा लागल्या होत्या. सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली. दुपारी मतदानाची टक्केवारी अपेक्षेपेक्षा जास्त वाढत चालली होती. मतदानादरम्यान दुपारच्या सुमारास दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यात बाचाबाची झाली. आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोधी गटातील काळेवाड ग्रामपंचायत सदस्य मंगेश सस्ते यांना कानाखाली लगावली.
दरम्यान, या प्रकारानंतर वातावरण तणावपूर्ण आहे. मात्र, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत, शांततेचे आवाहन केले. उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम, पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांच्यासह मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.