महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे काही दिवसांपूर्वीच आजोबा झाले आहेत. त्यामुळे ठाकरे कुटुंबात एका नव्या सदस्याची एन्ट्री झाली. राज यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या मुलाचं आज बारसं झालं आहे. शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या नव्या निवासस्थानी हा सोहळा पार पडला. कुटुंबीय आणि मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत नामकरणाचा छोटेखानी कार्यक्रम करण्यात आला.
काही दिवसांपूर्वी अमित ठाकरे यांनी आपल्या बाळाचा पहिला फोटो फेसबुकवर शेअर केला होता. अमित-मिताली यांना पूत्ररत्न झाल्यापासून ‘शिवतीर्थ’वर एक वेगळाच आनंद व्यक्त होत आहे. किआन असं त्यांनी आपल्या मुलाचं नाव ठेवलं आहे. मुंबईतच राज ठाकरे यांच्या नातवाचा जन्म झाला आहे, कारण मिताली यांचे सासर आणि माहेर दोन्हीही मुंबईतच आहे. त्यामुळे ठाकरे कुटुंबात सध्या आनंदी आनंद आहे.
अमित ठाकरेंचा २७ जानेवारी २०१९ रोजी मिताली बोरूडेशी विवाह झाला होता. लोअर परळमधील सेंट रेजिस या हॉटेलमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला. मिताली बोरूडे या फॅशन डिझायनर आहेत. त्यांनी फॅड इंटरनॅशनलमधून फॅशन डिझायनिंगचं शिक्षण पूर्ण केलंय. त्यांचे वडिलही प्रसिद्ध सर्जन आहेत. काही वर्षांपूर्वी मिताली आणि राज ठाकरे यांच्या कन्या उर्वशी ठाकरे यांनी ‘द रॅक’ हा कपड्यांचा ब्रँड लाँच केला होता.
जाणून घ्या किआनचा नेमका अर्थ
‘किआन’ हे हिंदू धर्मातील नाव आहे. या नावाचा अर्थ देवाची कृपा (Grace of God), प्राचीन (Ancient), राजेशाही (Royal) असा आहे. याची रास मिथून असून नक्षत्र मृग आहे. किआन हे मूळ संस्कृत नाव असून याचा अर्थ देवाचा आशीर्वाद असा होतो. किआन हे भगवान विष्णूचे दुसरे नाव आहे. असा किआन शब्दाचा अर्थ सापडतो.