घोडबंदर रोड ठरतोय यमाचा मार्ग ! गेल्या 6 महिन्यात १९ जणांनी गमावला जीव, खड्ड्यांच्या प्रश्नावर मनसे आक्रमक
ठाणे शहरातील वाढत्या खड्ड्यांच्या समस्येवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून, मनसेने गायमुख येथील घोडबंदर रोड परिसरात सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), ठाणे महापालिका (TMC), एमएमआरडीए (MMRDA) आणि एमएसआरडीसी (MSRDC) अशा चारही यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसमवेत खड्ड्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. मनसे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही पाहणी मेजर टेपसह करण्यात आली. यावेळी मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पाहणी दरम्यान खड्ड्यांची मोजणी करून त्याच्या खोली, लांबी आणि रूंदीची नोंद घेण्यात आली. गेल्या सहा महिन्यांत फक्त घोडबंदर रोडवरील खड्ड्यांमुळे तब्बल १९ नागरिकांचा मृत्यू झाल्याचा आरोप मनसेने केला आहे. हे निष्पाप जीव नेमके कोणाच्या हलगर्जीपणामुळे गेले, याचा जाब मनसे नेते अविनाश जाधव यांनी अधिकाऱ्यांना विचारला. त्यांनी सडेतोड शब्दांत सांगितले की, “जर खड्डे लवकरात लवकर भरले नाहीत, तर मनसे स्टाईलने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”
मनसेने यावेळी ठेकेदारांनाही लक्ष केलं. अविनाश जाधव म्हणाले, “जर काही ठेकेदार आत्महत्येच्या विचारात असतील, तर त्यांनी आत्महत्या न करता, त्यांनी ज्या नेत्यांना टक्केवारीनुसार पैसे दिले आहेत, त्यांच्या नावांची यादी जाहीर करावी. खरे गुन्हेगार हे नेतेच आहेत.” याशिवाय, “जर एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कुटुंबातील सदस्याचा जीव खड्ड्यामुळे गेला असता, तर कदाचित त्यांना या समस्येचे गांभीर्य लक्षात आले असते,” असा तीव्र सवालही त्यांनी उपस्थित केला.
घोडबंदर रोड, विशेषतः गायमुख परिसरात रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, खड्ड्यांमुळे दररोज अपघात होत आहेत. रस्त्यांच्या देखभालीबाबत जबाबदार असलेल्या सर्वच यंत्रणांनी दुर्लक्ष केले असल्याचे मनसेचे म्हणणे आहे. यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली असून, त्यानंतर देखील परिस्थितीत सुधारणा झाली नाही, तर मनसेकडून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
या दौऱ्यात मनसेचे शहरातील विविध विभागांतील पदाधिकारी, महिला आघाडीच्या प्रतिनिधी, मनसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मनसेचा हा आक्रमक पवित्रा पाहता, येत्या काळात ठाणे शहरातील खड्ड्यांवरील दुर्लक्ष नक्कीच थांबेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.