मनसे राज ठाकरे पक्ष नेता मेळाव्यात पुढची राजकीय चाल यावर भाष्य करण्यात आले (फोटो - सोशल मीडिया)
मनसे नेते राज ठाकरे यांनी राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांचा मेळाव्यात पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पक्षाची पुढील राजनीती आणि रोडमॅप याबाबत माहिती दिली आहे. तसेच राज ठाकरेंनी सत्ताधारी नेत्यांवर जोरदार टीकास्त्र डागले. यावेळी मनसे नेते संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार, अविनाश अभ्यंकर, गजानन काळे, अमेय खोपकर आणि अमित ठाकरे यांच्यासह राज्यातील सर्व प्रमुख जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते.
हे देखील वाचा : राज्यसभा खासदारकीवरुन महाविकास आघाडीमध्ये वादंग? शरद पवार की उद्धव ठाकरे कोणाला मिळणार संधी?
यावेळी मनसे नेते राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. राज ठाकरे म्हणाले की, आजची महाराष्ट्रातील जी सर्व परिस्थिती आहे. महाराष्ट्र हा सध्या आता आयसीयूमध्ये आहे. सध्या जी काही परिस्थिती आहे, त्याला आपण बाळसं म्हणू शकत नाही. त्याला आपण सूज म्हणू शकतो. ही इतकी विचित्र घाणेरडी सूज आहे की ज्यात अनेकांना असं वाटतं की जे काही सुरु आहे हे कायमस्वरुपी आहे. कायमस्वरुपी काहीही नसतं, असे सूचक वक्तव्य मनसे नेते राज ठाकरे यांनी केले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या मनामध्ये नक्की काय सुरु आहे याची चर्चा सुरु झाली आहे.
मनसे नेते राज ठाकरे पुढे म्हणाले की, सलमान खानचे वडील सलीम खान नेहमी सांगतात की प्रत्येक गोष्टीला एक एक्सपायरी डेट असते. त्यामुळे आता जे सत्तेत आहेत, त्यांना एक्सपायरी डेट असणारच आहे. त्यामुळे कोणतीही गोष्ट कायमस्वरुपी नसते. काँग्रेस जेव्हा सत्तेत होती तेव्हा अनेकांना असं वाटत होतं की काँग्रेसला कोण हलवणार, पण ती हलली. साधारण ५७ ते ५८ वर्ष ज्यांनी या देशावर राज्य केलं, तो पक्ष आज तुम्हाला चाचपडताना दिसतोय, तीच परिस्थिती यांचीही होणार हे निश्चित आहे. होणार म्हणजे होणार यात काही दुमत नाही, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षातील नेत्यांमध्ये विश्वास निर्माण केला.
हे देखील वाचा : “हा घात की अपघात…”; संजय शिरसाटांचे पवारांच्या विमान अपघातावर भाष्य
मनसे नेते राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना यापूर्वी तुम्ही अनेक आंदोलने केली यानंतर निवडणूकांकडे लक्ष द्या, आपल्याला प्रत्येक जिल्ह्यासाठी संपर्क प्रमुखांची निवड करायची आहे. पक्षाचा कार्यक्रम निवडणूक हाच आहे. आता पुढची 3 वर्ष निवडणूक नाही, त्यामुळे आता पक्ष बांधणीला सुरुवात करा. तसेच येत्या २७ फेब्रुवारी रोजी येणारा मराठी भाषा दिन राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा करा, असे आदेश मनसैनिकांना दिले आहेत.






