शेतकऱ्यांनो, पाऊस लांबतोय...! पेरण्यांची घाई करू नका; 'या' तारखेनंतर वाढणार पावसाची गती... (फोटो - istock)
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसापासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. काही भागांत दुपारी उन्हाचा कडाका दिसून येत आहे. असे असताना आता पावसाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. 15 जूननंतरच मोसमी पाऊस (मान्सून) पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नये, असे आवाहन राज्याच्या कृषी विभागाने केले आहे.
राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह, मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, शेतकरी, मासेमार बांधवांनी दक्षता घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पाऊस, पीक पाणी, धरणाच्या जलाशयातील पाणी साठा आदीचा आढावा घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
हेदेखील वाचा : Rain Update : मराठवाड्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस होणार; नांदेड, हिंगोलीत तर…
या बैठकीत कृषि विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी राज्यातील पीक पाणी, पेरण्या खते पुरवठा याबाबत सादरीकरणाव्दारे माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ‘राज्यातील सर्व भागात 15 जून मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नये. 15 जूननंतरच पावसाची मार्गक्रमण होण्यासाठी सक्रिय वातावरण निर्मिती होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यातील सतरा जिल्ह्यात पंचवीस टक्के पेक्षा कमी, बारा जिल्ह्यात पंचवीस ते पन्नास टक्के, चार जिल्ह्यांत पन्नास ते पंच्याहत्तर टक्के तर एका जिल्ह्यात शंभर टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे. राज्यातील विविध विभागांत खते आणि बियाणे यांचा सुरळीत पुरवठा झाला आहे. अनेक भागात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.
सांगलीच्या काही भागांतही मुसळधार पाऊस
सांगलीच्या तासगाव तालुक्याचा पूर्व भागातील डोंगरसोनी आणि सावळज परिसराला सोमवारी दुपारनंतर तब्बल दोन तास मुसळधार पावसाने झोडपून काढले. पावसाने डोंगरसोनी भागात जमिनीचे बांध फुटून ओढ्या-नाल्यांना पूर आले. शेतात सर्वत्र पाणीच पाणी पाहायला मिळाले.
हेदेखील वाचा : Local Body Elections: महापालिका निवडणुकीबाबत महत्त्वाची बातमी; पुणे-ठाण्यासह 9 महापालिकांमध्ये प्रभाग रचनेचे आदेश