मराठवाड्यात पुढील चार दिवस बरसणार (फोटो सौजन्य-X)
नांदेड : गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे. पण, आता येत्या चार दिवसांत मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार, 11 जून रोजी नांदेड व हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी ४० ते ५० कि.मी.) राहून मुसळधार पावसाची शक्यता आहे.
धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यात 12 जून रोजी तर 13 जून रोजी धाराशिव, लातूर, नांदेड व बीड जिल्ह्यात, १४ जून रोजी बीड व छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी ५० ते ६० कि.मी.) राहून मूसळधार पावसाची शक्यता आहे. ११ जून रोजी धाराशिव, लातूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड जिल्ह्यात, १२ जून छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यात, १३ जून रोजी परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यात, १४ जून रोजी जालना व धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी ४० ते ५० कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाडयात १० ते १२ जून रोजी काही ठिकाणी तर १३ व १४ जून रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात पुढील तीन ते चार दिवसात कमाल तापमानात हळूहळू २ ते ३ अं.से. ने घट होण्याची तर पुढील तीन ते चार दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.
मराठवाड्यात बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात १३ ते १९ जून दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे. सॅक, इस्त्रो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानुसार मराठवाड्यात बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे.
शेतकरी बांधवांनी पेरणीची घाई करू नये
शेतकरी बांधवांनी पेरणीची घाई करू नये. पेरणीयोग्य पाऊस (७५ ते १०० मिमी) झाल्यानंतरच पेरणी करावी. जमिनीत वापसा स्थिती असताना जर पूर्व मशागतीची कामे बाकी असतील, तर ती पूर्ण करून घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.