पुणे–छत्रपती संभाजीनगर प्रवास होणार वेगवान (फोटो- istockphoto)
पुणे–संभाजीनगर प्रवास होणार सुस्साट
ग्रीनफिल्ड एक्स्प्रेसवे प्रकल्प ठरणार गेमचेंजर
प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि आधुनिक होणार
पुणे: पुणे आणि छत्रपती संभाजीनगर यांच्यातील प्रवास आता केवळ तीन तासांत शक्य होणार आहे. राज्य सरकारने आखलेल्या नव्या ‘ग्रीनफिल्ड एक्स्प्रेसवे’ प्रकल्पामुळे हा प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि आधुनिक होणार आहे. सध्या या दोन्ही शहरांदरम्यानचा प्रवास आठ ते दहा तासांचा असतो; मात्र नवा सहापदरी महामार्ग तयार झाल्यानंतर हा वेळ तब्बल ७० टक्क्यांनी कमी होणार आहे.
तीन टप्प्यांमध्ये होणार काम
पहिला टप्पा : पुणे ते शिरूर दरम्यानचा भाग, जिथे विद्यमान मार्गाचा विस्तार आणि काही उड्डाणपूल उभारले जाणार आहेत.
दुसरा आणि तिसरा टप्पा : शिरूर ते संभाजीनगर या दरम्यानचा ग्रीनफिल्ड सहापदरी महामार्ग बांधण्यात येणार आहे. या भागात नव्या मार्गाची आखणी केली गेली असून तो थेट औद्योगिक पट्टे आणि एमआयडीसी भागांना जोडणार आहे.
औद्योगिक विकासाला चालना
या महामार्गामुळे पुणे आणि मराठवाडा विभाग यांच्यातील अंतर कमी होणार आहे. पुण्यातील औद्योगिक क्षेत्र आणि संभाजीनगर, बीड, जालना येथील एमआयडीसींना थेट जोड मिळणार असल्याने उद्योग, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळेल. तसेच मालवाहतुकीचा वेळ आणि खर्च दोन्ही घटतील. लॉजिस्टिक हब, कोल्ड स्टोरेज आणि ई-कॉमर्स नेटवर्कसाठीही हा मार्ग फायदेशीर ठरणार आहे.
लोकल प्रवासातही दिलासा
सध्या पुणे–संभाजीनगर मार्गावर नेहमी वाहतूक कोंडी, खराब रस्ते आणि अव्यवस्थित फेऱ्या यामुळे प्रवास त्रासदायक ठरतो. नव्या महामार्गामुळे प्रवाशांना सुसाट व सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळेल. पर्यटक, व्यावसायिक आणि शैक्षणिक प्रवासासाठीही हा मार्ग वरदान ठरणार आहे.
प्रकल्पाची सद्यस्थिती
एनएचएआयकडून (भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण) या प्रकल्पाची प्राथमिक आखणी पूर्ण झाली असून भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. काही भागात टेंडर प्रक्रियाही सुरु झाली आहे. राज्य सरकारकडून हा प्रकल्प ‘फास्ट ट्रॅक’वर नेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पुणे-मुंबई महामार्गावर जखमींना तातडीने उपचार मिळणार
पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर होणाऱ्या अपघातात वर्षाला सरासरी शंभर हुन अधिक व्यक्तींचा मृत्यू होतो. यात अनेकांना वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला आहे, पण आता अपघात ग्रस्तांना तत्काळ वैद्यकीय उपचार मिळावे म्हणून हेलिकॉप्टर सेवा उपलब्ध असणार आहे. ती देखील मोफत.’एमएसआरडीसी’ या मार्गावर चार ठिकाणी हेलिपॅड बांधणार आहे. ते ठिकाण देखील ठरविले असून लवकरच त्याचे काम सुरु होणार आहे.
पुणे-मुंबई महामार्गावर जखमींना तातडीने उपचार मिळणार; MSRDC ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
‘एमएसआरडीसी’ प्रशासन खालापूर, ताजेला, तळेगाव, व खोपोली या ठिकाणी चार ठिकाणी हेलिपॅड बांधणार आहे. येथे काही खासगी कंपनी आपल्या सीएसआर फंडातून उपलब्ध झालेल्या निधीच्या माध्यमातून हेलिकॉप्टरची सेवा देणार आहे. ही सेवा पूर्णपणे मोफत असणार आहे. हेलिकॉप्टर सेवा उपलब्ध झाल्याने त्यांना गोल्डन अवर मध्ये मदत देणे शकय होणार आहे. यामुळे जखमींचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे.






