राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे (फोटो- सोशल मिडिया)
मोहोळ येथे कृतिशील तरुणाई शिबिराचे उद्घाटन
सहा दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन
हे शिबिर पूर्णतः निवासी स्वरूपाचे असणार
मोहोळ: ‘स्त्रीला स्त्री म्हणून आणि पुरुषाला पुरुष म्हणून न पाहता जर माणूस म्हणून पाहिले, तर समाजात मोठे परिवर्तन घडून येईल,’ असे प्रतिपादन राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांनी केले. मोरवंची ता. मोहोळ येथील प्रार्थना बालग्राम येथे आयोजित ‘कृतिशील तरुणाई शिबिर ४.०’ च्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. प्रार्थना फाउंडेशन व सेवादायी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या सहा दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.
या उद्घाटन सोहळ्याला युवा उद्योजक सुहास आदमाने, अन्नछत्र मंडळ अक्कलकोटचे अभय खोबरे, मावीमचे जिल्हाप्रमुख सोमनाथ लामगुंडे,
सूर्यभान धोत्रे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रार्थना फाउंडेशनमार्फत चालवल्या जाणाऱ्या बालकाश्रम आणि वृद्धाश्रम या उपक्रमांचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले. समाजातील निराधार घटकांसाठी सुरू असलेले हे कार्य प्रेरणादायी असल्याचे युवा उद्योजक सुहास देशमाने यांनी सांगितले.
हे शिबिर सहा दिवसांचे असून पूर्णतः निवासी स्वरूपाचे आहे. यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून युवक-युवती सहभागी झाले आहेत. या शिबिरादरम्यान तरुणांमध्ये नेतृत्वगुण, सामाजिक जाणीव आणि संवेदनशीलता रुजवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जाणार असल्याचे संयोजक प्रसाद मोहिते यांनी सांगितले.
या शिबिरात केवळ व्याख्याने नसून श्रमदान, गटचर्चा, अनुभवाधारित उपक्रम, प्रेरणादायी सत्रे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रार्थना फाउंडेशन, सेवादायी फाउंडेशन आणि सर्व सेवाधाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. या शिबिरामुळे सहभागी तरुणांच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल घडण्यास मदत होईल, असा विश्वास संयोजकांनी व्यक्त केला आहे.






