मुंबई : कर्नाटकातील (Karnataka Elections 2023) जनतेनं मोदी-शहा (Modi-Shah) यांना झिडकारलं आहे, हे या निकालातून स्पष्ट झाल्याची प्रतिक्रिया खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली. महाराष्ट्रातील नेते ज्या-ज्या ठिकाणी गेले त्या-त्या ठिकाणी भाजपचा पराभव झाला आहे. कर्नाटकातील निकाल 2024 साठी विरोधी पक्षांच्या आघाडीच्या सत्तेचा दरवाजा उघडणारा असणार आहे. 2024 साठी असाच निकाल असेल. जनतेच्या ‘मन की बात’ या निमित्तानं समोर आली आहे, असंही राऊत म्हणाले आहेत.
बजरंगबलीची गदा भाजपच्या डोक्यात
भाजपचा पराभव झाला असला तरी आता तोडफोडीचं राजकारण करुन काहीतरी करण्याचा भाजपचा प्रयत्न सुरु असल्याचंही राऊत यांनी सांगितलंय. कर्नाटकात श्रीराम आणि बजरंगबली हे सत्याच्या बाजूनं आहेत, असंही ते म्हणालेत. पंतप्रधान मोदी आणि अमित शाहा यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. बजरंगबलीलाही या प्रचारात आणण्यात आले होते. त्या बजरंगबलीची गदा भाजपाच्या डोक्यात पडली आहे.
कर्नाटकातील मतदारांनी खोक्यांना नाकारलं
भाजपनं फौजाच्या फौजा, विमानं कर्नाटकात पाठवली होती. खोकेही पाठवले होते. मात्र या खोक्यांना कर्नाचकातील जनतेनं नाकारलं आहे. कर्नाटकातील निकाल हा भाजपाचा मोठा पराभव आहे. असंही राऊत म्हणालेत. मराठी मतं एकीकरण समितीला मिळाली नाहीत, तर यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, एखादी तरी जागा तरी एकीकरण समितीला मिळेल, असंही राऊत म्हणालेत.






