उदयनराजे भोसले यांची राहुल सोलापूरकर यांच्यावर टीका (फोटो- सोशल मिडिया/टीम नवराष्ट्र)
Rahul Solapurkar: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी वादग्रस्त विधान केले आहे. इतिहासामध्ये महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या आग्रा सुटकेबाबत त्यांनी वक्तव्य केल्यामुळे अनेक शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. आग्र्याहून सुटका करून घेण्यासाठी मिठाईच्या पेटाऱ्यांचा वापर करण्यात आला नव्हता, तर छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबाच्या अनेक सरदारांना लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात परतले, असा दावा अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केला आहे. यावर आता खासदार उदयनराजे भोसले यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
छत्रपतींचे वंशज आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्यावर टीका केली आहे. उदयनराजे भोसले म्हणाले, “राहुल सोलापूरकरला गोळ्याच घातल्या पाहिजेत. सोलापूरकर ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी त्याला गाडा.जे लाच घेतात त्यांना काही समजत नाही. केवळ मलाच नाही शिवभक्तांना वेदना होतात. असे वक्तव्य करणाऱ्यांची जीभ हासडली गेली पाहिजे. मी मुख्यमंत्री फडणवीस आणि अमित शहा यांना भेटणार आहे. अशी वक्तव्ये करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.”
काय होते राहुल सोलापूरकर यांचे वक्तव्ये?
मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी दिलेल्या एका यूट्यूब मुलाखतीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तीव्र वाद निर्माण झाला आहे. शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून सुटले होते आणि त्यासाठी पुरावेही उपलब्ध असल्याचा उल्लेख केला. त्यांच्या या विधानामुळे शिवप्रेमी आणि राजकीय नेत्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
सोलापूरकर यांनी “शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्यातून सुटले होते, पेटारे-बिटारे काहीच नव्हते” असा दावा केला. “मोहसीन खान किंवा मोईन खान नावाच्या सरदाराकडून महाराजांनी सही-शिक्क्याचे पत्र घेतले होते आणि त्या परवान्याच्या आधारे महाराज आग्र्यातून बाहेर पडले.” तसेच, “स्वामी परमानंद पाच हत्तींसह आग्र्यातून बाहेर पडले होते, याचेही पुरावे उपलब्ध आहेत,” असा उल्लेख त्यांनी केला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरून सोलापूरकरांच्या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. त्यांनी लिहिले, “छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊन सुटले, असे इतिहासाचे विकृतीकरण करणारा हा राहुल सोलापूरकर कोण महामूर्ख? हा मूर्ख माणूस महाराष्ट्राला इतिहास शिकवत आहे. महाराजांची उंची कमी करण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न आहे, त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. शिवप्रेमी हे सहन करणार नाहीत.”