सौजन्य - नवराष्ट्र टीम
बाजारपेठांमध्ये शिवरायांच्या प्रतिमांची धूम
पिंपरी आणि चिंचवडमधील मुख्य बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी शिवप्रेमींची मोठी गर्दी होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध आकारांतील आकर्षक मूर्ती, प्रतिमा आणि भगवे झेंडे यांनी दुकाने सजली आहेत. विशेषतः बालशिवाजी, राजमाता जिजाऊ आणि मावळ्यांच्या ऐतिहासिक वेशभूषेला मोठी मागणी असून, ड्रेपरी दुकाने ग्राहकांनी गजबजली आहेत.
पारंपरिक वेशभूषेवर भर
शोभायात्रांमध्ये सहभागी होण्यासाठी महिलांमध्ये नऊवारी साड्या आणि पारंपरिक दागिन्यांची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. पुरुषांकडून मोत्यांच्या माळा, भगवे फेटे, उपरणे आणि मेघडंबरी असलेल्या साहित्याची जोरात खरेदी सुरू आहे.
ढोल-ताशांच्या गजरात होणार मानवंदना
शहरातील विविध सामाजिक मंडळे, संस्था आणि शाळा-महाविद्यालयांच्या वतीने भव्य शोभायात्रा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सराव: ढोल-ताशा आणि झांज पथकांचा सराव शहरातील विविध भागात जोमाने सुरू आहे.
विद्युत रोषणाई:
एच.ए. कॉलनी आणि निगडी येथील भक्ती-शक्ती शिल्प समूह परिसरातील शिवरायांच्या पुतळ्यांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, या ठिकाणी पथकांकडून मानवंदना दिली जाणार आहे.
‘शिवगर्जना’ महानाट्याचे भव्य आयोजन
यंदा महापालिकेतर्फे निगडी येथील नियोजित महापौर निवास परिसरात ‘शिवगर्जना’ या महानाट्याचे सादरीकरण होणार आहे. सुमारे २५० हून अधिक कलाकार, घोडे, उंट आणि नेत्रदीपक आतषबाजीच्या माध्यमातून शिवचरित्रातील सुवर्णक्षण जिवंत केले जाणार आहेत. अत्याधुनिक प्रकाशयोजना आणि ध्वनिसंयोजन हे या महानाट्याचे मुख्य आकर्षण ठरेल.
शिवनेरी किल्ल्यावर रंगणार शिवजन्म सोहळा
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रीमंडळातील मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवार (दि.१९) रोजी किल्ले शिवनेरीवर शिवजन्म सोहळा पार पडणार आहे. राज्य शासनाच्या पर्यटन विभागातर्फे मंगळवार दिनांक १७ ते गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी दरम्यान ‘हिंदवी स्वराज्य” महोत्सव’ आयोजित केले आहे. यानिमित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पर्यटन विभागाचे उपसंचालक भरत लांघी उपस्थित होते.






