‘आमचं काय व्हायचं ते होऊ दे, तुरुंगात जायचीही तयारी; पण...’; भाजप प्रवेशाबाबत विशाल पाटलांचं मोठं विधान
राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार विशाल पाटील यांना भाजपमध्ये प्रवेशाची ऑफर दिल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. जयश्रीताई मदन पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर ही चर्चा अधिकच गडद झाली. मात्र, अक्कलकोट येथे झालेल्या काँग्रेस मेळाव्यात विशाल पाटलांनी चंद्रकांत पाटलांची ऑफर धुडकावून लावली.
विशाल पाटील म्हणाले, “आमचं काय व्हायचं ते होऊ दे, तुरुंगात जावं लागलं तरी बेहत्तर; पण काँग्रेस सोडायची आमची तयारी नाही.” त्यांनी चंद्रकांतदादांच्या प्रयत्नांवर थेट प्रहार करत स्पष्ट केलं की, विचारांच्या राजकारणात त्यांची निष्ठा काँग्रेसकडेच आहे.
अक्कलकोट येथील या मेळाव्याला आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील, खासदार प्रणिती शिंदे, सुवर्णा मलगोंडा यांच्यासह आयोजक मल्लिकार्जून पाटील उपस्थित होते. या मंचावरून विशाल पाटलांनी भाजपवर आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलं.
“भाजपने आमच्याच घरात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. आमच्या वहिनींना पक्षात घेऊन भाजपने आपली रणनीती स्पष्ट केली. मी अपक्ष निवडून आलो असलो तरी लोकांना सांगितलं की माझं विचारविश्व काँग्रेसचं आहे, म्हणूनच जनता माझ्या पाठीशी उभी राहिली,” असं ते म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की, “काँग्रेसचा विचार एवढा खोल आहे की, तो कोणीही सहजपणे संपवू शकत नाही. म्हणूनच अपक्ष असलो तरी काँग्रेस विचारांवर चालणारा एकमेव खासदार म्हणून मी निवडून आलो आहे. अडचणी येतील, तुरुंगातही जावं लागेल, तरी आमच्यासारखे आणखी दहा-वीस जण तयार होतील. काँग्रेससाठी आमची निष्ठा अढळ आहे.”
दुसरीकडे, चंद्रकांत पाटील यांनी विशाल पाटलांची प्रशंसा करत त्यांना “अभ्यासू पण थोडे आक्रमक” अशा शब्दांत वर्णन केलं होतं. “त्यांच्यासारख्या नेत्यानं भाजपमध्ये यायला हवं. आम्ही त्यांचं स्वागतच करू. पण त्यांनी जर गांभीर्याने विचार केला नाही, तर २०२९ साठी आम्ही आमचा उमेदवार तयार करू,” असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला होता. मात्र, विशाल पाटील यावर अजूनही ठाम भूमिका घेत भाजप प्रवेश नाकारत आहेत.