आणीबाणीत ज्यांनी वर्तमानपत्र बंद पाडलं त्यांचा मुलगा आज भाजपात; शंकररावांवरून संजय राऊतांचा पलटवार
25 जून 1975 भारताच्या राजकीय इतिहासातील एक वादग्रस्त दिवस. याच दिवशी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. भाजपने याच पार्श्वभूमीवर 25 जून हा दिवस “संविधान हत्या दिवस” म्हणून साजरा करत काँग्रेसवर टीका केली. मात्र, विरोधकांच्या मते सध्या देशात अघोषित आणीबाणी सुरू असल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.
मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना राऊत म्हणाले, “हुकूमशाहीचं मोठं उदाहरण म्हणजे श्वेता संजीव भट. त्या गेल्या सात वर्षांपासून आपल्या पतीसाठी संघर्ष करत आहेत. हीच खरी आणीबाणी आहे. आणीबाणीविषयी बोलणाऱ्यांनी आताची परिस्थिती पाहावी.”
आणीबाणीच्या काळात पत्रकारांचे आवाज दाबण्यात आले, वृत्तपत्रे बंद पाडण्यात आली. त्यावेळी ‘मार्मिक’सारखं व्यंगचित्र साप्ताहिकही बंद करण्यात आलं. त्यावेळी ज्यांनी वर्तमानपत्रांवर बंदी घातली, त्या शंकरराव चव्हाण यांचा मुलगा आज भाजपमध्ये आहे. अशोक चव्हाण आता मोदींचे लाडके झाले आहेत, असा मिश्किल टोला त्यांनी लगावला.
मोदींवर सरेंडरचा आरोप
पहल्गाम हल्ला आणि पाकिस्तानविरोधी कारवाया याबाबत विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी होत असताना केंद्र सरकार दुर्लक्ष करत असल्याचाही आरोप राऊत यांनी केला. “आम्हाला विचारायचं आहे की मोदीजी, आपण सरेंडर का केलं?” असा थेट सवालही त्यांनी केला.
“लोकशाहीचा रोज खून”
देशात गेल्या 11 वर्षांपासून अघोषित आणीबाणी सुरू असल्याचं मत व्यक्त करत राऊत म्हणाले, “इंदिरा गांधींनी आणीबाणी घोषित केली ती परिस्थितीच्या अनुषंगाने होती. ती त्यांची घटनात्मक बाजू होती. मात्र आज कोणतीही घोषणा न करता लोकशाही गुदमरवली जात आहे.”
मोदी आणि अमित शहा हे दररोज लोकशाहीचा खून करत असल्याचा घणाघात करत राऊत म्हणाले, “आम्ही आणि अनिल देशमुख तुरुंगात गेलो, ते देशासाठी होतं. आता आमच्यासाठी पेन्शन जाहीर करा,” असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.