खासदार विशाल पाटील यांचा जयश्री पाटील यांना पाठिंबा (फोटो- ट्विटर)
सांगली: राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. २० तारखेला मतदान तर २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. सर्व पक्षाच्या स्टार प्रचारकांनी सभा घेण्यास सुरुवात केली. महायुती आणि महाविकास आघाडीला काही प्रमाणात बंडखोरी रोखण्यात यश आले. मात्र सांगली जिल्ह्यात वेगळाच पेच निर्माण झाला आहे. विधानसभेत देखील लोकसभा निवडणुकीप्रमाणेच पॅटर्न वापरला जाण्याची शक्यता आहे. खासदार विशाल पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे सांगलीत पुन्हा लोकसभेसारखाच गेम होण्याची शक्यता आहे. अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांना निवडून द्या असे आवाहन खासदार विशाल पाटील यांनी केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सांगली पॅटर्नची चर्चा सुरू झाली आहे .
मी निवडून आल्यानंतर महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. आता जयश्री पाटील या देखील महाविकास आघाडीच्या उमेदवार असल्याचे मी जाहीर करतो. वसंतदादा पाटील घरण्यावर कॉँग्रेस सातत्याने अन्याय का करत आहे असा प्रश्न खासदार विशाल पाटील यांनी उपस्थित केला. कॉँग्रेसचा अधिकृत उमेदवार सांगलीत भाजपचा पराभव करू शकत नाही. त्यामुळे अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांना निवडून द्या असे विशाल पाटील म्हणाले.
सांगलीत महायुतीने भाजपच्या सुधीर गाडगीळ यांना उमेदवारी दिली आहे. तर त्यांच्याविरुद्ध कॉँग्रेसने पृथ्वीराज पाटील यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. त्यानंतर जयश्री पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दरम्यान जयश्री पाटील यांनी देखील उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने सांगली विधानसभेत तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
सांगली विधानसभेच्या अपक्ष उमेदवार श्रीमती जयश्रीवहिनी मदनभाऊ पाटील यांचा प्रचार शुभारंभ माजी केंद्रीय मंत्री मा. प्रतिकदादा पाटील व बहुसंख्य कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत काँग्रेस कमिटी, सांगली येथे उत्साहात पार पडला. याप्रसंगी नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना संबोधित… pic.twitter.com/nzyJoGio8r
— Vishal Prakashbapu Patil (@patilvishalvp) November 5, 2024
प्रचाराचा शुभारंभ करताना खासदार विशाल पाटील म्हणाले, “जयश्री पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत, हे मी जाहीर करतो. कारण मी खासदार म्हणून महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. जसे लोकसभेला ९९ खासदार निवडून आले होते आणि मी १०० वा होतो. त्याप्रमाणेच जयश्री पाटील या १०० व्या आमदार असतील. २०१४ नंतर सांगलीत वसंतदादा पाटील कुटुंबाला एकदाही उमेदवारी दिली गेली नाही. लोकसभेत आणि विधानसभे फसवणूक झाली . वसंतदादा पाटील कुटुंबाने कॉँग्रेसच्या विरोधात नेमकी काय चूक केली ते समजत नाही. आमची निष्ठा कुठे कमी पडली हे कळत नाही. मात्र इतके होऊन देखील मी कॉँग्रेसला पाठिंबा दिला.कॉँग्रेसने दिलेला उमेदवार हा भाजपच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी सक्षम नाही. येणाऱ्या विधानसभेत जयश्री पाटील यांचाच विजय होणार. ”
हेही वाचा: विशाल पाटलांचे बंड कायम; सांगली लोकसभेसाठी २० उमेदवार रिंगणात
लोकसभेत नेमके काय घडले?
सांगली लोकसभेत उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. त्यावरून मोठा गोंधळ निर्माण झाला. उमेदवारी न मिळाल्याने विशाल पाटील हे अपक्ष लढले. सांगली कॉँग्रेसने ठाकरेंच्या उमेदवाराला मदत करण्याएवजी विशाल पाटील यांना मदत केल्याचे म्हटले जाते. विशाल पाटील हे अपक्ष खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी बाहेरून कॉँग्रेसला खासदार म्हणून पाठिंबा दिला. तेव्हापासून राज्यात सांगली पॅटर्नची चर्चा सुरू झाली. विधानसभेला देखील तसेच काहीसे चित्र पाहायला मिळण्याची शक्यता आहे.