मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा ४० लाख रूग्णांना लाभ, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या प्रमुखांची माहिती
अंबरनाथ: राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजनेचा गोरगरीब रुग्णांना मोठ्या प्रमाणात फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्विकारल्यापासून २ वर्षात जवळपास ४० लाख रुग्णांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजनेचा लाभ घेतला असून ३४० कोटी रुपयांचे अर्थ सहाय्य वितरीत करण्यात आले आहे, अशी माहिती शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्य प्रमुख राम राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हेदेखील वाचा –राजापूर तालुक्यात विहिरीत पडला बिबट्या, वनविभाग आणि ग्रामस्थांकडून सुरक्षित सुटका
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्य प्रमुख राम राऊत यांनी सांगितलं की, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून राज्यातील गोरगरीब रुग्णांना आजारांवर उपचार घेण्यासाठी अर्थ सहाय्य उपलब्ध करून देण्यात येते. या माध्यमातून जवळपास २० आजारांवर उपचार करण्यासाठी अर्थसहाय्य करण्यात मदत मिळते. यामध्ये हृदय प्रत्यारोपण, यकृत प्रत्यारोपण, किडनी प्रत्यारोपण, फुफ्फुस प्रत्यारोपण, लहान बालकांच्या शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, हृदयरोग, डायलिसिस यासारख्या एकूण वीस आजारांचा समावेश आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या संकल्पनेतून ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा राज्यातील ४० लाख रुग्णांना लाभ मिळाला असून त्यासाठी जवळपास ३४० कोटी रुपयांचे अर्थसहाय्य रुग्णांना वितरीत करण्यात आले आहे.
अंबरनाथ विधानसभा क्षेत्रातील रुग्णांना जवळपास १ कोटी ३२ लाख रुपये मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून वितरित करण्यात आले अशी माहिती आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी दिली. मुख्यमंत्री सहायता निधीतुन अर्थसहाय्य मिळवण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया निःशुल्क असून रुग्ण किंवा रुग्णाचे नातेवाईक मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अर्ज करू शकतात. यासाठी टोल फ्री संपर्क क्रमांक ८६५०५६७५६७ देण्यात आला आहे.
हेदेखील वाचा –पुढील पाच वर्षात दरडोई उत्पन्नात होणार $२०००ची वाढ; अर्थमंत्र्यांनी कौटिल्य आर्थिक परिषदेत केले संबोधन
राज्यातील ज्या रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजना, चॅरिटी हॉस्पिटल, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम या तीन योजनांचा लाभ मिळत नाही अशा, पात्र रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक सहाय्य उपलब्ध करुन देण्यात येते. यासाठी ३ लाख ६० हजार रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादा आहे. अंबरनाथ पूर्वेच्या खासदार कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष राज्य प्रमुख राम राऊत, गणपती कांबळे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यातील सर्वसामान्यांना मदत व्हावी आणि त्यांच्यावर योग्यप्रकारे उपचार करता यावेत, यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजना सुरु करण्यात आली आहे. या याजनेचा राज्यभरातील नागरिकांना फायदा होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजनेच्या माध्यमातून रुग्णांवर योग्य प्रकारे उपचार केले जात आहेत. या योजनेचा राज्यातील ४० लाख रुग्णांना लाभ मिळाला असून त्यासाठी जवळपास ३४० कोटी रुपयांचे अर्थसहाय्य रुग्णांना वितरीत करण्यात आले आहे.