मुंबई : मुंबई हे शहर (Mumbai City) विविधतेने नटलेल्या संस्कृतींना एकत्र जपणारे असून सर्वसमावेशक असे आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागातर्फे मुंबई फेस्टिवलचे (Mumbai Festival) आयोजन करण्यात येते. मुंबईची संस्कृती आणि विविधता जपणारा लोकांचा हा हक्काचा उत्सव आजपासून सुरू होत असून याचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. मुंबईच्या क्रॉस मैदान गार्डन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis), मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या हस्ते मुंबई फेस्टिवल 2024 (Mumbai Festival 2024) चे उद्घाटन करण्यात येणार आहे. मुंबई फेस्टिवल संस्कृती, सिनेमा, संगीत, मनोरंजन, चित्रपट आणि स्टार्टअप चॅलेंजेस, खेळ आणि खरेदी यांचा एक अनोखा संगम ठरतो आहे.
मुंबईतील बहुप्रतिक्षित सोहळ्यांपैकी एक असणाऱ्या मुंबई फेस्टिवल 2024 विविधतेने नटलेल्या समाजांना एकत्र आणण्यासाठी आणि या शहराचा अजरामर वारसा पुढे चालवण्यासाठी महत्त्वाचा दुवा आहे. मुंबईच्या अलौकिक सांस्कृतिक वारसाचे वर्णन करत अनोख्या सांस्कृतिक कलाकृतीचा पाया या फेस्टिवलने रचला आहे. 20 ते 28 जानेवारी दरम्यान साजरा करण्यात येणारा मुंबई फेस्टिवल 2024 हा मुंबईच्या सांस्कृतिक वारसाचे प्रतिबिंबच असेल. क्रॉस मैदान येथे होणाऱ्या या फेस्टिवलच्या नेत्रदीपक उद्घाटन समारंभामध्ये कला क्षेत्रातील दिग्गज लोक उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटन सोहळ्यामध्ये काय असणार खास
उद्घाटन सोहळ्यावेळी स्टार कलाकार सारा अली खान, अनुपम खेर, सचिन खेडेकर, आदिनाथ कोठारे, अमेय वाघ आणि मिनी माथूर उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर अशोक हांडे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे नेत्रदीपक सादरीकरण करणार आहेत. नृत्यग्रामचे सादरीकरण व प्रसिद्ध कथक आणि लावणी विशेषज्ञ अदिती भागवत आणि धारावी ड्रीम प्रोजेक्टच्या मुलांसह तबला वादक मास्टर अनुराधा पाल यांचे अनोखे सादरीकरण याचा समावेश आहे. तसेच उद्घाटन समारंभाच्या परफॉर्मन्समध्ये प्रतिभावान गायक डॉ. तुषार गुहा यांचे स्वागतगीत, श्रद्धा विद्यालय तर्फे एक उत्साही लेझीम सादरीकरण आणि शर्वरी जेमिनिस यांच्या कथ्थक नृत्याचा देखील समावेश असणार आहे.
सर्वांना घेता येणार ‘अस्सल मुंबई’चा अनुभव
सर्वांना ‘अस्सल मुंबई’चा अनुभव घेता यावा यासाठी, मुंबई फेस्टिवल बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर महा मुंबई एक्स्पोचे आयोजन करत आहे. यामध्ये विशेष खाद्यपदार्थांची मेजवानी – ‘टेस्ट ऑफ मुंबई’, गेम झोन थ्रिल, दुर्मिळ उत्पादने, हस्तकला, फ्ली मार्केटसारख्या अनुभवांचा समावेश आहे. इतकेच नाही तर, यात अनेक बक्षिसे समाविष्ट आहेत जी दररोज दिली जातील, लोकसंगीत आणि लोकप्रिय संगीत, नृत्य, कॉमेडी, मास्टर शेफद्वारे लाइव्ह कुकिंग आणि रिटेल थेरपीसाठी रिटेल संधी, कार्यशाळा आणि मुलांसाठी गेम्स देखील उपलब्ध असणार आहे.
खाद्य संस्कृती येणार चाखता
भेळपुरी, पाणीपुरी, गोळा, कुल्फी आणि आईस्क्रीम विकणारे स्टॉल्स असणार आहेत. तसेच मासळी आणि चिकन-मटण थाळीच्या विविध चवी चाखता येणार आहेत. सिचुआन स्पाइसच्या अनोख्या मुंबई-शैलीतील इंडो-चायनीज पाककृतीचा आस्वाद घेता येणार आहे. मुंबई फेस्टिवल २०२४ मध्ये जिटीसीद्वारे “टेस्ट ऑफ मुंबई” नावाने प्रचलित २० पेक्षा जास्त खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर खाद्य संस्कृती चाखता येणार आहे.