कातळशिल्पांना 'जागतिक वारसा; सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची माहिती
राज्यातील कातळशिल्प ठिकाणांचा समावेश युनेस्कोच्या ‘जागतिक वारसा स्थळां’च्या यादीत समावेश व्हावा, यासाठी या कातळशिल्पांसंदर्भात सर्व माहिती संकलित करून याबाबतचा एक रोडमॅप तयार करावा, अशा सूचना राज्याचे सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी दिले.
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये राज्यातील कातळशिल्पांचा समावेश समाविष्ट होण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. कातळशिल्पांची प्रसिद्धी व्हावी यासाठी समाजमाध्यमांचा वापर करून त्यावर चांगल्या दर्जाचे छायाचित्रे अपलोड करण्यात यावी. डॉक्युमेंट्रीसंदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या संस्थांचीा पारदर्शक पद्धतीने निवड करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
शेलार यांच्या अध्यक्षतेखाली पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे सोमवारी बैठक पार पडली. स्पॅनिश शिष्टमंडळाने या कातळशिल्पांना भेट दिल्यानंतर जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यासंदर्भात प्रस्ताव मांडण्यात आला आहे. आपल्या राज्यातील कातळशिल्पांची चांगल्या प्रकारे प्रसिद्धी होणे आवश्यक आहे. तसंच या कातळशिल्पांचा संपूर्ण देशात प्रचार आणि प्रसार करून लोकांचे ध्यान आकर्षित करणे आवश्यक आहे. शिवाय कातळशिल्पांवर विभागाने आंतरराष्ट्रीय दर्जाची डॉक्युमेंटरी तयार केली पाहिजे आणि त्यासाठी या कातळशिल्पांचे फोटो तसेच व्हिडिओज मोठ्या प्रमाणात संकलित करून ठेवावेत, असंही शेलार यांनी म्हटलं आहे.
यानिमित्ताने विवेक वाघ कृत कातळशिल्पांवरील माहितीपटाचे प्रदर्शन करण्यात आले. याबरोबरच वृषाली लेले, अबोली थत्ते व राहुल नरवणे यांनी कातळशिल्प या विषयावर नृत्यनाटिका सादर केली. या बरोबर डॉ. सूरज पंडित, डॉ. निलंबरी जगताप व वास्तुविशारद मृदुला माने यांची कान्हेरी लेणीः भविष्यातील जागतिक वारसा, महाराष्ट्रातील संग्रहालय चळवळीचा इतिहास व डिजिटल डॉक्युमेंटेशन अनुक्रमे या विषयांवर व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमास अपर मुख्य सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चौरे आणि पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक श्रीमती मीनल जोगळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
Shani Jayanti 2025: शनि जयंती आणि बडा मंगल महासंयोग, आज चुका केल्यास ‘नरक’ होईल आयुष्य; संकटांचा कहर
शेलार म्हणाले की, मराठा लष्करी भूप्रदेशाबरोबर कोकणातील कातळशिल्प हा जागतिक वारसा या दृष्टीने महत्वाचा विषय असून तो जगासमोर मांडताना संशोधनात्मक पद्धतीने मांडला जावा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘विरासत से विकास तक’ या दूरदृष्टीची टप्याटप्प्याने अंमलबजावणी अपेक्षित आहे. भारतातील संग्रहालय चळवळ ही ब्रिटिश राज्यात उदयाला आली असल्याने त्यात वसाहतवादी दृष्टिकोन स्पष्टपणे दिसतो, असेही ते म्हणाले. भविष्यातील संग्रहालये ही भारतीय दृष्टिकोनातून तयार व्हावीत, ही अपेक्षा शेलार यांनी यावेळी व्यक्त केली.