राज्यातील तब्बल 67 लाख लाडक्या बहिणींना धक्का; अनुदानाची रक्कम अद्याप नाहीच
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राज्यातील महिलांसाठी चांगलीच फायद्याची ठरताना दिसत आहे. महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहिण’ योजनेतून आता ६७ लाखांपेक्षा अधिक महिलांना वगळण्यात आले आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केलेल्या आणि योजनेच्या पात्रता निकषांचे उल्लंघन करणाऱ्या महिलांची ओळख पटल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
सरकारी आकडेवारीनुसार, राज्यातील केवळ १.८० कोटी महिलांनी ३१ डिसेंबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली. २.५ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी सुरू केलेली लाडकी बहिण योजना पात्रता उल्लंघनाच्या प्रकरणांमध्ये अडकली आहे. यापूर्वीही अनेक अपात्र लाभार्थ्यांना काढून टाकण्यात आले आहे. त्यानंतर सरकारने ई-केवायसी अनिवार्य केले आणि सर्व लाभार्थ्यांची छाननी सुरू केली.
हेदेखील वाचा : Ladki Bahin Yojana: दोन महिन्यांचा हप्ता अद्याप बाकी अन् त्यातच 47 हजार…; सरकार अॅक्शन मोडमध्ये
आकडेवारीवरून असे दिसून येते की, योजनेतून वगळण्यात आलेल्या ६७ लाख महिलांमध्ये केवळ ई-केवायसी पूर्ण न करणाऱ्याच महिला नाही तर मूलभूत पात्रता निकष पूर्ण न करणाऱ्या महिलांचाही समावेश आहे. यात चारचाकी वाहने असलेल्या किंवा सरकारी नोकरीत असलेल्या महिलांचा समावेश होता. या सर्व महिलांना आता योजनेतून वगळण्यात आले आहे.
…त्यांनाच मिळणार नियमित लाभ
महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी अलीकडेच ट्विट करून स्पष्ट इशारा दिला होता की, ई-केवायसीची अंतिम मुदत वाढवली जाणार नाही. सर्व पात्र महिलांनी वेळेत प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन केले. मंत्र्यांच्या इशाऱ्यानंतरही असंख्य महिलांनी ही प्रक्रियाच पूर्ण केली नाही. आता, ज्या महिलांनी त्यांचे ई-केवायसी पूर्ण केले त्यांनाच नियमित लाभ मिळेल. योजनेची अखंडता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी खऱ्या गरजू महिलांपर्यंत लाभ पोहोचतील, याची खात्री करण्यासाठी हे सरकारी पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात 47 हजार महिलांची नावे वगळली
रत्नागिरी जिल्ह्यातील ४७ हजार लाडक्या बहिणींची नावे छाननीनंतर कमी करण्यात आली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. लाडक्या बहिणीना गेल्या नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांचा हप्ता अजूनही मिळालेला नाही. निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली त्याचा फायदा महायुतीला मिळाला. महिलांच्या बंपर व्होटिंगमुळे महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेत आले, मात्र सत्तेवर येताच या योजनेच्या लाभार्थी महिलांची फेरपडताळणी किंवा छाननी करण्यात आली.






