माधवबाग येथील मंदिरासाठी येणार अमित शाह (फोटो सौजन्य - Instagram)
मुंबई: माधवबाग संकुलातील प्रसिद्ध श्री लक्ष्मी नारायण मंदिराचे १५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल २७ मे २०२५ रोजी जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशासाठी हा एक ऐतिहासिक क्षण असल्याने या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या विशेष प्रसंगी कॅबिनेट मंत्री आणि मलबार हिल विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगलप्रभात लोढा तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे देखील उपस्थित राहणार आहेत. सोबत महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवर देखील आवर्जून उपस्थित राहणार आहेत.
मंदिराच्या शतकोत्तर परंपरेचा गौरव करणारा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम देखील यावेळी आयोजित करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरणासाठी संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा श्रीमती संध्या पुरेचा, सरफोजी राजे भोसले संस्था यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
श्री लक्ष्मी नारायण मंदिर आणि माधवबाग चॅरिटी यांच्या विश्वस्त मंडळातर्फे आयोजित हा कार्यक्रम सकाळी १० वाजता सुरू होईल. या दिवशी महाराष्ट्रातून भाविक, नागरिक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
श्री लक्ष्मी नारायण मंदिर हे मुंबईच्या प्रदीर्घ सामाजिक व आध्यात्मिक वारशाचे प्रतिक आहे. माधवबाग संकुलाचा इतिहास तब्बल १५० वर्षांपूर्वीचा असून, जेव्हा हा परिसर ‘लालबाग’ म्हणून ओळखला जात असे. तेव्हा इ. स. १८७४ साली कपोल समाजातील दोन मान्यवर उद्योजक श्री वर्जिवंदास माधवदास आणि श्री नरोत्तम माधवदास यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ एक भव्य मंदिर संकुल उभारण्याचा निर्णय घेतला आणि यासाठी मोठा भूखंड विकत घेतला. त्यानंतर १८७५ साली, श्री लक्ष्मी नारायण मंदिराची स्थापना करण्यात आली.
या मंदिराचे बांधकाम प्रसिद्ध वास्तुविशारद श्री भीमा रामजी यांच्या देखरेखीखाली पोरबंदरच्या दगडांनी करण्यात आले होते. पारंपरिक स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना असलेले हे मंदिर आजही मुंबईतील एक प्रमुख श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते. श्री लक्ष्मी नारायण मंदिर आपल्या १५० व्या वर्षात पदार्पण करत असताना, हा महोत्सव केवळ एक धार्मिक कार्यक्रम नसून, तो श्रद्धा, सेवा आणि सामाजिक नेतृत्वाच्या प्रदीर्घ परंपरेचा गौरव देखील आहे.
पावसाळ्यापूर्वी म्हाडाच्या उपकर प्राप्त इमारतींच्या दुरुस्तीला गती
आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील म्हाडाच्या उपकर प्राप्त इमारतींच्या दुरुस्तीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्वसन मंडळ (म्हाडा) यांना उद्देशून पाठवलेल्या पत्राला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.