मनसे अध्यक्ष रायज ठाकरे (फोटो- you tube )
शिवतीर्थ दादर येथे पार पडला मनसेचा गुढीपाडवा मेळावा
राज ठाकरे यांनी नागरिकांना केले संबोधित
संदीप देशपांडे यांची राज्य सरकारवर टीका
MNS Raj Thackeray Live: आज सगळीकडे गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. दरम्यान आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नागरिकांना संबोधित केले. आज दादर येथील शिवतीर्थ येथे मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडला. यावेळेस मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. दरम्यान राज ठाकरे आपल्या भाषणात काय म्हणाले ते, जाणून घेऊयात.
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, “लक्षात ठेवा, आपण जे उभे आहोत ते महाराष्ट्रसाठी उभे आहोत. महाराष्ट्राला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी म्हणून आपल्याला जी सत्ता घ्यायची आहे, ती भविष्यामध्ये सत्ता हातात घेणार म्हणजे घेणारच. हे फक्त मी तुमच्या टाळ्यांसाठी सांगत नाही. तो माझा आत्माविश्वास आहे. आता तीन वर्ष निवडणुका नसल्यामुळे कंत्राटदारांकडून पैसे खायला सगळेच मोकळे आहेत. ”
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, “देशात धाकधूक सुरू आहे. भीषण परिस्थिती आहे. गॅस मिळत नाहीयेत. काही गोष्टी आपल्या पंतप्रधानांकडून राहून गेल्या. इराण आपल्याला ज्या प्रकारे इतके वर्ष साथ देत होता. आता इराणवर हल्ले सुरू असताना आपण इराणला साथ द्यायला हवी होती. इराणमधून आपल्याकडे तेल येते. खामेनी गेल्यावर देखील आपल्या पंतप्रधानांनी भाष्य केले नाही. त्यांच्या अडचणीच्या काळात आपण उभे राहिलो नाही याचा त्रास आपल्याला निश्चित होणारच.”
“माध्यमांवर दबाव आहे. राज्य, आपला देश एका विचित्र स्थितीत अडकला आहे. मुख्यमंत्री सांगतात विकास करतोय. अकरा लाख कोटींचे कर्ज आहे. पृथ्वीराज चव्हाण असताना दोन लाख कोटींचे कर्ज होते. 2014 नंतर हे कर्ज 11 लाख कोटींवर गेले. पिझ्झा मागवला तर 10 मिनिटात येतो. पण तुम्हाला जायचे तर जाता येत नाही. ट्रॅफिक जाम, फूटपाथ भरलेले,” असे राज ठाकरे म्हणाले.
“तीन वेळा कर्जमाफी झाली, पण रोज राज्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत. कोणाला काही पडले नाहीये. भाषा संपली म्हणून अनेक देश संपलेले आहेत. मराठी भाषा बोलणारे आहात म्हणून तुम्ही मराठी माणूस आहेत. प्रत्येक राज्य आपली अस्तित्व, आपली भाषा टिकवून आहे. यांनी महाराष्ट्र विकायला काढलाय. मुख्यमंत्र्यांकडे गृहखाते आहे. राज्यभर ड्रग्स विकले जात आहेत, असे राज ठाकरे म्हणाले.






