मुंबई : मालाडमधील उद्यानाला देण्यात आलेलं टिपू सुलतान यांचं नाव आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते उद्घाटन यामुळे या वादावरून शिवसेना-भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. उद्यानाला टिपू सुलतानचं नाव देण्यास विरोध केला आहे. भाजपच्या काही नेत्यांनी तर या प्रकरणी अस्लम शेख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर काही नेत्यांनी महाराष्ट्रात दंगल पेटेल असा इशाराही दिला आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे. दंगल करून दाखवाच. इथे ठाकरे सरकार आहे, असा सज्जड दमच संजय राऊत यांनी भाजपला भरला आहे. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी भाजपला जोरदार फटकारेही लगावले आहेत.
भाजपा नेते राज पुरोहित यांनी अस्लम शेख यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यासंबंधी विचारलं असता संजय राऊत म्हणाले की, “मग सर्वात आधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राजीनामा घ्यावा लागेल. रामनाथ कोविंद यांनी कर्नाटकाच्या विधानसभेत जाऊन टिपू सुलतानचं गुणगाण गात गौरव केला होता. योद्धा, ऐतिहासिक योद्धा, स्वातंत्र्यसैनिक या उपाध्या राष्ट्रपतींनीच लावल्या आहेत. त्यामुळे सर्वात आधी भाजपाने त्यांचा राजीनामा घ्यावा”.
आम्हाला इतिहास कळतो. तुम्ही इतिहासाचे ठेकेदार नाहीत. तुम्ही कशा पद्धतीने इतिहास बदलता, लिहिता, दिल्लीत स्वत:चा इतिहास कसा लिहायला घेतला हे आम्हाला माहीत आहे. टिपू सुलतान, हैदर अली, श्रीरंगपट्टणम, मैसूर राज्य सर्व आम्हाला माहीत आहे. टिपू सुलतानने काय अत्याचार, अन्याय केला, ब्रिटिशांसोबत कसा लढा दिला हे सर्व आम्हाला माहीत आहे. आम्हाला सांगायची गरज नाही. आंदोलन करू, महाराष्ट्र पेटवू ही भाषा तुमच्या तोंडी असेल तर या पेटवापेटवीतील महाराष्ट्रातील एक्सपर्ट कोण आहेत हे सर्वांना माहीत आहे. पण आम्ही हे करत नाही, असं ते म्हणाले.