मोदींच्या कार्यक्रमात मोठी खळबळ; बनावट PMO ID, बंदुकधारी बॉडीगार्डसह दोघे ताब्यात
PM Modi Security Breach : मुंबईतून अतिशय धक्कादायक बाब समोर येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणीच सुरक्षेचा गंभीर प्रकार समोर आला आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील NMACC परिसरात पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. यातील एका तरुणाकडे पंतप्रधान कार्यालयाशी संबंधित असल्याचं सांगणारं बनावट ओळखपत्र आढळलं, तर त्याच्यासोबत असलेल्या बॉडीगार्डकडे बंदूक सापडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून पंतप्रधानांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहन पारेख नावाचा 24 वर्षीय तरुण NMACC परिसरात फिरत होता. विशेष म्हणजे, तो स्वतःला थेट PMO चा अधिकारी असल्याचं सांगत होता. त्याच्याकडे PMOचं ID कार्डही होतं. मात्र सुरक्षारक्षकांना त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याची चौकशी आणि तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान त्याचं ओळखपत्र बनावट असल्याचं समोर आलं. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी तातडीने त्याला ताब्यात घेतलं. पंतप्रधानांचा कार्यक्रम असल्याने NMACC परिसरात आधीपासूनच कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अशा परिस्थितीत बनावट ओळखपत्राच्या आधारे एखादी व्यक्ती कार्यक्रमाच्या आवारात पोहोचल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
या सर्व प्रकरणात रोहन पारेख एकटाच नसून त्याच्यासोबत एक खासगी बॉडीगार्ड असल्याचं समोर आलं आहे. या बॉडीगार्डकडे बंदूक आढळल्याने हे प्रकरण आणखी गंभीर झालं. पंतप्रधानांच्या VVIP आणि SPG सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार सुरक्षा यंत्रणांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
घटनेनंतर मुंबई पोलीस आणि संबंधित सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. दोन्ही संशयितांची चौकशी करण्यात येत असून हे दोघे नेमके कोणाच्या संपर्कात होते, कार्यक्रमाच्या ठिकाणी येण्यामागचा त्यांचा उद्देश काय होता आणि बनावट PMO ID कुठून मिळालं, याचा तपास सुरू आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास मुंबई क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आल्याची माहिती आहे. बनावट ओळखपत्र तयार करण्यामागे आणखी कोणी आहे का, बॉडीगार्डकडे असलेल्या बंदुकीचा परवाना काय आहे आणि या संपूर्ण प्रकारामागे नेमका काय हेतू होता, याचा शोध आता तपास यंत्रणा घेत आहेत.
पंतप्रधानांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे सुरक्षा व्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित झाले असून तपासातून पुढे काय समोर येतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.






