File Photo : Crime
मुंबईतील मानखुर्द परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मानखुर्द परिसरात एका अल्पवयीन मुलाने महिला डॉक्टरला धमकी दिल्याची घटना घडली आहे. तुझी अवस्था देखील कोलकाता डॉक्टरसारखी होईल, असं त्या अल्पवयीन मुलाने महिला डॉक्टरला म्हटलं होतं. याप्रकरणामुळे काही काळ परिसरात गोंधळ निर्माण झाला होता. याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असल्याचं सांगितलं जात आहे. महिला डॉक्टर आणि अल्पवयीन मुलामध्ये दुचाकी पार्किंगवरून वाद झाला होता. यावेळी डॉक्टरने अल्पवयीन मुलाला कानशिलात लगावली. त्यानंतर तो मुलगा संतापला आणि कोलकाता प्रकरणाबाबत तू ऐकले आहेस, तुझ्यासोबतही असेच होईल, अशी धमकी त्याने डॉक्टरला दिली.
हेदेखील वाचा-राज ठाकरे उद्या बदलापूरकरांच्या भेटीला येणार; बदलापूरमधील घटनेबाबत नागरिकांशी संवाद साधणार
याबाबत सविस्तर माहिती अशी की, हे प्रकरण मुंबईतील मानखुर्द भागातील असून शनिवारी दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास एक महिला डॉक्टर तिच्या क्लिनिकमध्ये पोहोचली. क्लिनिकच्या बाहेर एक दुचाकी उभी होती, त्यामुळे डॉक्टरांना क्लिनिकचा दरवाजा उघडता आला नाही. त्यामुळे महिला डॉक्टरने बाईक भिंतीला लावली आणि तिचे क्लिनिक उघडले आणि रुग्णांना तपासायला सुरुवात केली. बाईक दुसऱ्या ठिकाणी पार्क केल्यामुळे अल्पवयीन मुलाला राग अनावर झाला आणि त्याने डॉक्टरला धमकी दिली.
या प्रकरणाबाबत महिला डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास एक मुलगा दवाखान्यात आला आणि शिवीगाळ करत माझी दुचाकी या बाजूला कोणी पार्क केली आहे, अशी विचारणा करू लागला. जेव्हा महिला डॉक्टरने हे कृत्य केल्याचे सांगितले. तेव्हा अल्पवयीन मुलाने डॉक्टरांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महिला डॉक्टरने मुलाला दोनदा कानशिलात लगावली. त्यानंतर तो मुलगा तेथून निघून गेला आणि काही वेळाने त्याच्या काही नातेवाईकांसह तेथे आला आणि पुन्हा शिवीगाळ करू लागला.
हेदेखील वाचा- ‘नो मीन्स नो’, अल्पवयीन मुलीने नकार दिल्यानंतर वारंवार प्रेम व्यक्त करणं लैंगिक छळासमान; मुंबई हायकोर्टाचा निर्णय
त्याने महिला डॉक्टरला छत्री फेकून मारली. यावेळी या मुलाने डॉक्टरांना धमकी दिली की, तुला कोलकातामधील घटना माहित आहे, तुझ्यासोबतही असेच वागले जाईल, तुला विवस्त्र करून तुझ्या दवाखान्याला आग लावली जाईल असे म्हणत त्या मुलाने आणि त्याच्या महिला नातेवाईकाने डॉक्टरला मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणाची माहिती देताना झोन 6 चे डीसीपी हेमराज राजपूत यांनी सांगितलं की, आम्ही पीडित महिला डॉक्टरांशी बोललो आहोत. डॉक्टर आणि अल्पवयीन मुलामध्ये दुचाकी पार्किंगवरून वाद झाला, त्यावेळी महिला डॉक्टरने अल्पवयीन मुलाला कानशिलात लगावली. त्यानंतर मुलगा त्याच्या नातेवाईकाला घेऊन आला होता. यावेळी त्याने डॉक्टरांना धमकी दिली आणि त्या मुलाने आणि त्याच्या महिला नातेवाईकाने डॉक्टरला मारहाण केली. या प्रकरणात एक अल्पवयीन मुलगा आणि तीन महिला आरोपी आहेत. या लोकांवर पोलीस कडक कारवाई करतील.