महाविकास आघाडी (फोटो - ट्विटर)
मुंबई: राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहेत. त्यादृष्टीने सत्ताधारी आणि विरोधक यांनी तयारी सुरू केली आहे. महायुतीने लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यानंतर विधानसभेसाठी चांगलीच कंबर कसली आहे. महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू आहे. काही जागांवर कहा तिढा सुटणे अजूनही बाकी आहे. मात्र येत्या काही दिवसांत महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान महाविकास आघाडीने मुंबईने ३६ पैकी २३ जागांवर तिढा सोडवला आहे असे म्हटले जात आहे. ३६ पैकी २३ जागांवर महाविकास आघाडीचे एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी लवकरात लवकर जागावाटप पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडी बैठकांवर बैठका घेत आहे. त्यातच आता मुंबईतील ३६ पैकी २३ जागांचा तिढा सुटल्याचे समजते आहे. यामध्ये २३ जागांपैकी शिवसेना ठाकरे गट १३, कॉँग्रेस ८ आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार गट १ आणि समाजवादी पक्ष १ या जागांवर एकमत झाले आहे. तरी अजून १३ जागांचा प्रश्न सुटलेला नाही. यातील काही जागांवर तीनही पक्ष दावा करत आहेत. त्यामुळे या जागांवर एकमत किंवा तिढा सुटण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीने आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपासाठी गेले काही दिवस सलगपणे बैठकांचे सत्र सुरू ठेवले आहे. राज्यातील २८८ जागांपैकी १४० ते १५० जागांवर महाविकास आघाडीमधील तीनही पक्षांचे एकमत झाल्याची माहिती आहे. तर उर्वरित जागांवर अद्याप चर्चा सुरू आहे. काही जागांवर तीनही पक्षांचा दावा असल्याने या जागांचा प्रश्न सुटणे अजून बाकी आहे.
महायुतीत काय घडतंय?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते अमित शहा यांची भेट घेतली. मात्र, या बैठकीत काय चर्चा झाली याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.महाराष्ट्रातील सत्ताधारी ‘महायुती’ आघाडीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उपस्थिती आणि भाजपच्या काही नेत्यांच्या मुस्लिम विरोधी प्रचाराला राष्ट्रवादीचा विरोध या पार्श्वभूमीवर ही बैठक झाल्याचे सांगण्यात येत आहे. आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते नेहमीच राष्ट्रवादीवर आक्षेप घेत आहेत, हे विशेष. पुढील महिन्यात होणाऱ्या २८८ सदस्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या तीन मित्रपक्षांनी जागावाटप निश्चित केलेले नाही.