नवी मुंबईत खाद्यपदार्थांच्या तारखांमध्ये फेरफार करून विक्री; गुन्हे शाखेची मोठी कारवाई (Photo - X)
Navi Mumbai News : अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून राज्यभर कारवाई सुरू असतानाच नवी मुंबईत खाद्यपदार्थांच्या लेबलमध्ये फेरफार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. विविध नामांकित कंपन्यांच्या खाद्यपदार्थांच्या पॅकेटवरील उत्पादन तारीख, एक्सपायरी किंवा बेस्ट बिफोर तारीख, बॅच नंबर आणि कमाल किरकोळ किंमत बदलून त्यांची विक्री तसेच निर्यात केली जात असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेने कारवाई करत दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने तुर्भे येथील टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील एका गोदामावर छापा टाकला. या कारवाईदरम्यान खाद्यपदार्थांच्या पॅकेटवरील माहितीची तपासणी करण्यात आली. त्यावेळी जुन्या तारखांमध्ये बदल करून त्यावर नव्या तारखा छापण्यासाठी डेट प्रिंटिंग मशीनचा वापर होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनाही तपासात सहभागी करून घेण्यात आले. सलग सहा दिवस करण्यात आलेल्या तपासणीत तब्बल 18 निर्यातदारांच्या सुमारे 2 कोटी 46 लाख 53 हजार रुपयांच्या मालाची पाहणी करण्यात आली. त्यापैकी 11 निर्यातदारांच्या सुमारे 75 लाख 21 हजार रुपयांच्या मालावरील लेबल आणि पॅकेटवरील विविध तपशीलांमध्ये बदल केल्याचे आढळून आले.
या कारवाईत उत्पादन तारीख, एक्सपायरी किंवा बेस्ट बिफोर तारीख, बॅच नंबर तसेच MRPमध्ये फेरफार केल्याचे समोर आले. त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याबरोबरच अन्नपदार्थांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
या प्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानके कायदा तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयप्रकाश संचतीराम सिंग आणि जया नवरंग बहादूर सिंग या दोघांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. संबंधित 11 निर्यातदार कंपन्यांनाही प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे.
पोलिसांनी कारवाईदरम्यान डेट प्रिंटिंग मशीन, विविध नामांकित कंपन्यांचे खाद्यपदार्थ आणि इतर साहित्य असा एकूण 75 लाख 21 हजार 269 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नवी मुंबई गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाकडून सुरू आहे. खाद्यपदार्थांच्या लेबलमध्ये नेमक्या कोणत्या पद्धतीने फेरफार करण्यात आला आणि या प्रक्रियेमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जात आहे.






