फोटो सौजन्य सोशल मीडिया
या बैठकीला उद्योग, व्यापार, कृषी आणि विविध व्यावसायिक क्षेत्रांतील मान्यवर, उद्योजक तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. नियुक्तीनंतर प्रवीण दाभाडे यांनी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत दादा जगताप, संचालक मंडळ आणि उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. संस्थेने दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईसारख्या आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या शहरातील उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक आणि नवउद्योजकांना एकाच व्यासपीठावर आणणे हे मुंबई चॅप्टरचे प्रमुख उद्दिष्ट असणार आहे. विशेषतः नव्याने व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांना तसेच लघु आणि मध्यम उद्योजकांना व्यवसायवृद्धीसाठी आवश्यक मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि सहकार्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
व्यवसाय सुरू करण्यापासून त्याचा विस्तार करण्यापर्यंत आवश्यक असलेले कौशल्य, बाजारपेठेची माहिती, व्यवसाय व्यवस्थापन आणि आर्थिक नियोजन याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. यासाठी विविध प्रशिक्षण कार्यशाळा, उद्योजकता विकास कार्यक्रम आणि व्यावसायिक संवाद मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.
नवीन उद्योजकांना आर्थिक अडचणींवर मात करता यावी, यासाठी बँका, वित्तीय संस्था आणि शासकीय योजनांमधील उपलब्ध आर्थिक सहाय्याच्या संधींपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. याशिवाय उद्योग आणि कृषी क्षेत्रातील उद्योजकांमध्ये समन्वय वाढविणे, स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि रोजगारनिर्मितीला चालना देण्यावर भर राहणार आहे.
महिला आणि तरुण उद्योजकांना व्यवसायाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत. कौशल्य विकास, व्यावसायिक प्रशिक्षण आणि परस्पर सहकार्याच्या माध्यमातून सक्षम व्यावसायिक परिसंस्था निर्माण करण्याचा प्रयत्न असेल. मुंबईतील उद्योजकांना केवळ व्यासपीठ उपलब्ध करून न देता त्यांच्या व्यावसायिक प्रगतीसाठी प्रत्यक्ष सहकार्य आणि नवीन संधी निर्माण करण्यावर भर देणार असल्याची भूमिका प्रवीण दाभाडे यांनी व्यक्त केली.






