पाच महिने उलटूनही भांडुप बस अपघातग्रस्तांना अद्याप शासकीय मदत नाही! राजोल पाटील यांची बेस्ट भवनात धाव
या भेटीदरम्यान राजोल पाटील यांनी भांडुप परिसरात वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या घटनांबाबत गंभीर चिंता व्यक्त करत, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी ठाम मागणी केली. विशेषतः वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील अपुरी सुरक्षितता व नियोजनाचा अभाव यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
राजोल पाटील यांनी बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांना दिलेल्या पत्रात २९ डिसेंबर २०२५ रोजी भांडुप स्टेशन रोड परिसरात झालेल्या दुर्दैवी अपघाताचा आवर्जून उल्लेख केला. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना अद्याप शासकीय मदत मिळालेली नसल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून देत, संबंधित विभागामार्फत ती मदत तातडीने उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी राजोल पाटील यांनी भांडुपसह मुंबई उपनगरातील प्रवाशांच्या दैनंदिन गैरसोयीचाही मुद्दा उपस्थित केला. प्रवाशांची वाढती संख्या व अपुऱ्या सार्वजनिक वाहतूक सुविधांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून प्रवाशांच्या सोयीसाठी भांडुप, विक्रोळी, मुलुंड, घाटकोपर तसेच मुंबईतील विविध भागांसाठी बेस्ट बस सेवा तातडीने सुरू करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी निवेदनाद्वारे केली.
राजोल पाटील यांनी सांगितले की, भांडुपकरांच्या सुरक्षिततेचा व सोयी-सुविधांचा प्रश्न हा माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे. अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना व मृतांच्या कुटुंबियांना लवकरात लवकर मदत मिळावी, बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी राजोल पाटील यांनी मांडलेल्या सर्व मागण्यांची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागांशी चर्चा करून आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.






